मुंबईSunil Tatkare :राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुती तसंच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या नावावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपानं सहा उमेदवारांची नावं पक्षश्रेष्ठींकडं पाठवली आहेत. मात्र, राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झालं नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादीचं पक्षासह चिन्ह मिळाल्यानंतर प्रथमच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मंत्रालयासमोरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात प्रवेश केला. कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांच्यासह यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
स्वराज्य सप्ताह आयोजन :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिवजन्मोत्सव ‘स्वराज्य सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलीय. स्वराज्य सप्ताहाची सुरुवात गेट वे ऑफ इंडियापासून होईल, तर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचडला येथे स्वराज्य सप्ताहाची सांगता होईल. हा सोहळा आठ दिवस चालणार आहे. स्वराज्य सप्ताह गेट वे ऑफ इंडिया येथून 12 फेब्रुवारीला सुरू होऊन 19 फेब्रुवारीला संपेल. राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल मुंबईतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. जिल्हास्तरावरही हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वराज्य सप्ताहाच्या लोगो, पताकाचं अनावरण करण्यात आलं.
बाबा सिद्धीकी राष्ट्रवादीत येत आहेत :माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचा मुलगा झीशान सिद्धीकी विद्यमान आमदार असून त्याबाबत निर्णय घेणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे. कोणत्याही अटीशिवाय राष्ट्रवादीत प्रवेश केला तरी चालेल, असं तटकरे यावेळी म्हणाले.