नागपूर Nagpur Lok Sabha Result 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये नितीन गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून प्रचंड मतांनी निवडून येत हॅट्रिक केली. देशातील विकासाचा अग्रणी चेहरा म्हणून नितीन गडकरी हे नागपूरच्या जनतेची पहिली पसंत ठरले. एक आश्वासक चेहरा म्हणून नितीन गडकरी यांच्याकडं पाहिलं जातं. नितीन गडकरी हे राजकारणापलीकडं जाऊन मैत्री जपतात. ते जातीपातीच्या बंधनात न अडकणारे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी हे यावेळी सुद्धा प्रचंड मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवतील असं भाकीत ईटीव्ही भारतकडून करण्यात आलं होतं. हे भाकीत अगदी तंतोतंत ठरलं. नितीन गडकरी यांच्या विजयाची पाच प्रमुख कारणं कोणती आहेत, याचं विश्लेषण या खास वृत्तातून जाणून घ्या.
संविधान बदलाच्या चर्चेनं भाजपाच्या विजयी रथाला ब्रेक :भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यास संविधान बदलेल अशा चर्चेनं भाजपाच्या विजयी रथाला ब्रेक लागलाय. नागपूर तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं पाईक असलेलं एक शहर आहे. देशभरात जो नरेटिव्ह सेट झाला होता, त्याचा सर्वाधिक फटका भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना बसला. मात्र, याला नितीन गडकरी अपवाद ठरले आहेत.
नागपूरचा चेहरा-मोहराचं बदलला : गेल्या दहा वर्षात नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदललेला आहे. राज्यातील नाही तर देशातील सर्वात वेगवान प्रगती करणाऱ्या शहरांच्या यादीमध्ये नागपूर शहर अग्रणी आहे. नितीन गडकरी यांच्या पुढाकारानं नागपूर शहरात मेट्रोचं जाळ विणण्यात आलं. शहरातील रस्ते देखील दर्जेदार निर्माण केली. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी नितीन गडकरी यांनी अनेक किलोमीटर लांबीचे अनेक पूल बांधले आहेत.
सर्वसमावेशक राजकारणी : नितीन गडकरी हे राजकारणापलीकडं जाऊन मैत्री जपतात, ते जातीपातीच्या बंधनात कधीही न अडकणारे नेते आहेत. कोणत्याही पक्षाचा नेता असो की, कार्यकर्ता नितीन गडकरी मात्र मदतीसाठी सदैव तत्पर असतात. मी कधीही कुणाची जात बघून मदत करत नसतो, असंही ते अनेकदा आपल्या भाषणात म्हणाले आहेत. त्यामुळे गडकरी हे देशातील सर्वसमावेशक राजकारणी असल्याचं देखील बोललं जाते. हे कारण देखील त्यांच्या विजयात महत्वाचं आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम जनतेपर्यंत पोहोचवताना नितीन गडकरी कधीही आक्रमक दिसून आले नाहीत.
नितीन गडकरी स्पष्ट वक्ते : स्पष्ट वक्तेपणाकरता देखील नितीन गडकरी ओळखले जातात. कधी कधी तर हाच स्पष्ट वक्तेपणा त्यांच्यासाठी अडचणीचा ठरतो. मात्र, तरी देखील नितीन गडकरी यांनी त्यांचा हा गुण जोपासला आहे. गडकरी यांच्याकडं काम घेऊन येणाऱ्या लोकांना देखील ते काम होईल की नाही यासंदर्भात स्पष्टपणे सांगतात. कुणालाही ताटकळ ठेवणं, हे त्यांच्या तत्त्वात बसणारं नाही. हा देखील गुण नितीन गडकरी यांच्या विजयातील प्रमुख कारण आहे.