नवी मुंबई : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 16 आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई गुन्हे शाखेनं अटक केली आहे. या तस्करांकडून तब्बल 12 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई हद्दीत आता नायजेरियन नागरिकांपाठोपाठ अफ्रिकन तस्करही आपला जम बसवू पाहत असल्याचं स्पष्ट होत आहे.
तस्करांकडून 12 कोटींचे अमली पदार्थ जप्त : नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या, अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे नवी मुंबई आयुक्तालयाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी एकूण 25 ठिकाणी छापे टाकले. या कारवाईमध्ये तब्बल 150 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी सहभागी होते. यामध्ये 2 किलो 45 ग्राम कोकेन, 663 ग्राम एम डी पावडर, 15 ग्राम मिथिलीन, 23 ग्राम चरस, 31 ग्राम गांजा, असा तब्बल 12 कोटींचा माल जप्त करण्यात आला आहे.
16 अफ्रिकन नागरिकांना घेतले ताब्यात : "या कारवाईमध्ये तब्बल 16 आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. तर, 73 आफ्रिकन नागरिकांचा पासपोर्ट आणि व्हिसा संपल्यानं त्यांना देश सोडून जाण्यासाठी नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहआयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त अमित काळे सहआयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबिंग ऑपरेशन द्वारे करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 150 पेक्ष्या अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते," अशी माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली.
हेही वाचा :
- कस्टम विभागाची मोठी कारवाई! मुंबई विमानतळावर तब्बल 1.45 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त
- नियतीने दिलं आणि ड्रग्जने नेलं, तस्करीमुळे दिग्गज खेळाडूंचं करियर 'क्लीन बोल्ड' - Sports Persons in Drugs Smuggling
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने तब्बल ९८२ किलो ड्रग्ज ची लावली विल्हेवाट - Disposed 982 kg drugs