नवी मुंबई Girl Found Murdered : एकतर्फी प्रेमातून नवी मुंबई नजीकच्या उरण शहरात राहणाऱ्या 20 वर्षीय यशश्री शिंदे हिच्या खून प्रकरण राज्यभर गाजलं. ही घटना ताजी असतानाच बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईतील सीवूडसमध्ये आणखी एका 20 वर्षीय तरुणीचा तिच्या प्रियकरानं गळा आवळून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भाविका मोरे असं या घटनेतील मृत तरुणीचं नाव आहे. प्रेयसीचा खून करुन प्रियकरानं तिचा मृतदेह डीपीएस लगतच्या तलावात टाकून दिल्यानं नवी मुंबईत दहशत पसरली आहे. प्रेयसीचा गळा आवळल्यानंतर प्रियकरानं देखील आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काय आहे प्रकरण : नवी मुंबईतील सिडवूड सेक्टर 48 इथं राहणारी भाविका मोरे (20) असं तरुणीचं नाव असून तिचे पनवेल तालुक्यातील पेंधर गावातील स्वस्तिक पाटील (22) या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे. स्वस्तिक यानंच भविकाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः देखील तिथल्या तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार एनआरआय पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बुधवार संध्याकाळी भाविकाचा आढळला मृतदेह :बुधवारी संध्याकाळी नवी मुंबईतील सिवूड्स इथल्या डीपीएस लगतच्या तलावात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना भाविका मोरेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर मच्छीमारांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच एनआयआर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भविकाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्रथमदर्शनी भविका हिचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं आढळून आलं. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे एनआयआर पोलीस ठाण्याच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.