नवी मुंबई : इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्यानं मोबाईलच्या दुकानात भावी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी भावी इंजिनियरला अटक केली असून त्याच्याकडून चोरी केलेले मोबाईल जप्त केले आहेत. विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. परिस्थितीनं हतबल केल्यानं मोबाईल दुकान फोडून महाविद्यालयाची फी भरायची होती, अशी कबुली या भावी इंजिनियरनं पोलिसांकडं दिली. मोबाईल दुकान फोडीचं कारण ऐकूण पोलीस देखील हळहळले.
काय आहे प्रकार : नवी मुंबई परिमंडळ 2 च्या हद्दीतील पनवेल येथील मोबाईलचे दुकान फोडण्यात आले. या दुकानातून तब्बल 54 मोबाईल चोरीला गेले होते. याप्रकरणी मोबाईल दुकानदारानं पनवेल शहर पोलीस ठाण्यात मोबाईल चोरी झाल्याची तक्रार दाखल केली. दुकान मालकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीनं आरोपीची ओळख पटवली आणि चोरट्याला गुन्हे शाखेनं अटक केली. आरोपीकडं चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. आपण अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असून अंतिम वर्षात असल्याचं त्यानं यावेळी पोलिसांना सांगितलं. महाविद्यालयाची फी भरण्यासाठी आपल्याकडं पैसे नव्हते. त्यामुळे वर्ष वाया जाऊ नये, या भितीतून मोबाईल दुकान फोडून चोरी केल्याची कबुली त्यानं पोलिसांना दिली.