मुंबई New Education Policy : राज्यातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या शाळांमध्ये आता विद्यार्थी आनंदात शिक्षण घेऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासोबतच त्यांना सेलिब्रिटीच्या माध्यमातून ऑनलाईन शिकवलं जाणार आहे. तसंच 'हॅप्पी सॅटर्डे' ही नवी संकल्पना सुरु करणार असल्याची माहिती, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.
शाळाबाह्य मुलांसाठी विविध उपक्रम : राज्य सरकारच्या वतीनं शाळाबाह्य मुलांना शाळेत येण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. शालेय अभ्यासक्रम हा मुलांना आवडणारा आणि मनोरंजनातून शिक्षण देणारा असावा, असं नवं धोरण राज्य सरकार राबवण्याच्या विचारात आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून हे धोरण राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळांमधून राबवलं जाणार असल्याची माहिती, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलीय.
पूर्व प्राथमिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश : जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या माध्यमातून आता पूर्व प्राथमिक वर्ग सुरु करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. हे वर्ग विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि आवड निर्माण व्हावी यासाठी आवश्यक असलेलं शिक्षण देईल, तसे अभ्यासक्रम आम्ही सुरु करत आहोत. तसंच विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातच व्यावसायिक अथवा उपजीविकेच्या दृष्टीनं महत्त्वाचं शिक्षण दिलं जाणार असल्याचही शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितलंय. तसंच मुलांना हॉर्टिकल्चरचं ज्ञान शालेय जीवनातच देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी परसबाग कशी फुलवावी किंवा टेरेसवर कशी बाग करता येऊ शकेल, याबाबतचं ज्ञानही विद्यार्थ्यांना देणार आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.