शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा मंदिराच्या (Sai temple Shirdi) सुरक्षा पथकात आता 'सिंबा' नावाच्या नव्या श्वानाची एन्ट्री झाली आहे. 'वर्धन' श्वानानं दहा वर्ष सेवा दिल्यानंतर तीन महिन्याचा 'सिंबा' आता बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात दाखल झालाय. सिंबाची बीडीडीएस पथकाकडून ट्रेनिंग सुरू असून लवकरच तो साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहे.
शिर्डी साईबाबा मंदिर हे जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र असल्यानं येथे दररोज लाखो भाविक साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी येतात. याचबरोबर व्हीव्हीआयपी देखील मोठ्या प्रमाणात इथं येत असतात. साई मंदिर आणि परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीनं साईबाबा मंदिरासाठी स्पेशल बीडीडीएस पथक तैनात करण्यात आले आहे.
साई मंदिर सुरक्षा प्रमुख सतीष घोटेकर यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) बीडीडीएस पथकाकडून तपासणी : साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या पहाटेच्या काकड आरती, मध्यान्ह आरती आणि धुपाआरती तसंच रात्रीच्या शेजाआरतीच्या अगोदर साईंच्या समाधी मंदिरासह परिसरातील सर्वच मंदिरात बीडीडीएस पथकाकडून तपासणी केली जाते. बीडीडीएस पथकात पूर्वी 'वर्धन' नावाचा श्वान कार्यरत होता. मात्र, तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या जागी आता सिंबा दाखल झालाय. सिंबाचं सध्या साई मंदिर परिसरात प्राथमिक प्रशिक्षण सुरू आहे. लवकरच तो पुणे सीआयडी येथून ट्रेन होऊन साई मंदिराच्या सुरक्षेसाठी तैनात होणार असल्याची माहिती, साई मंदिर पोलीस निरीक्षक सतीष घोटेकर यांनी दिली.
शाल देऊन सत्कार : पुढं ते म्हणाले, "गेल्या दहा वर्षांपासून साई मंदिरात वर्धन श्वानानं सेवा दिल्यानंतर आज तो सेवानिवृत्त झाल्यानं बीडीडीएस पथकातील अनेकांना अश्रू अनावर झाले होते. पथकाच्या वतीनं वर्धनचा साईबाबांची शाल, फुलांचा हार देऊन सन्मान करण्यात आला. तर सिंबाला साई मंदिर परिसरात आणण्यात आलं. यावेळी साईबाबांची 'ओम साई राम' नावाची शाल देऊन सिंबाचा सत्कार करण्यात आला."
हेही वाचा -
- शिर्डी साईबाबांसह शनिदेवाच्या चरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नतमस्तक, पाहा व्हिडीओ
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साईचरणी; म्हणाले 'समाजातील दुफळी लवकर दूर करण्यासाठी सरकार करणार प्रयत्न'
- भाविकांसाठी आनंदाची बातमी; आता तुम्ही झाला साईंचे व्हीआयपी भक्त, संस्थानच्या 'या' निर्णयामुळं भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण