ठाणे New Cricket Stadium in Mumbai : टी 20 विश्वचषक विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाचं भारताची क्रिकेट पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं. तसंच त्यानंतर विधान भवनात देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करण्यात आलं. या समारंभात मुंबई येथील ब्रेबॉर्न आणि वानखेडे ही दोन क्रिकेट स्टेडियम कमी पडत असल्यानं मुंबई विभागात भव्यदिव्य नवं क्रीडांगण उभारावं अशी इच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसातच याबाबतची गोड बातमी समोर आली आहे.
मुंबईपासून 68 किमी अंतरावर नवं क्रीडांगण : शासनाच्या संबंधित प्रशासनानं समृध्दी महामार्ग व मुंबई नाशिक महामार्गालगत भिवंडी तालुक्यातील आमणे या गावातील 50 एकर गायरान जागा उपलब्ध केली असून मुंबई क्रिकेट असोसिएशननं या जागेसाठी निविदा सादर केली आहे. याठिकाणी एक लाख क्षमतेचं नवीन क्रिकेट क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. मुंबईपासून सुमारे 68 किमी अंतर असलेल्या या क्रीडांगणावर मुंबईसह समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील क्रिकेटप्रेमी या नव्या क्रिकेट पंढरीत खेळाचा आनंद घेऊ शकणार आहेत. या परिसरात क्रीडांगण बनण्याचा स्थानिकांना नक्कीच आनंद आहे पण ते बनवत असताना स्थानिकांना या ठिकाणी रोजगार उपलब्ध कसा होईल याकडेसुध्दा प्रशासनानं लक्ष देण्याची गरज असल्याची भावना स्थानिक नागरीक देविदास चोरघे यांनी बोलून दाखवली.