मुंबई :बुधवारी झालेल्या एलिफंटा बोट अपघातामुळे परिसरातील पर्यटनाला फटका बसण्याची भीती व्यक्त केली जातेय. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेक पर्यटक गेट वे ऑफ इंडियाला भेट देण्याच्या उद्देशाने येतात. इथे येणं त्यांचं मुख्य आकर्षण असतं. गेट वे ऑफ इंडियाकडे आल्यावर जलप्रवास करून एलिफंटाकडे जाण्याकडे त्यांचा भर असतो. राज्याच्या, देशाच्या विविध भागांतून आलेल्या अनेक पर्यटकांना पाण्यातून प्रवास करणे शक्य झालेले नसल्याने घारापुरी बेटाला भेट देऊन पर्यटन आणि जलप्रवास करणे याकडे अनेकांचा कल असतो. मात्र या दुर्घटनेमुळे पर्यटकांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
वर्षभरात साडेआठ लाख प्रवाशांचा गेट वे येथून प्रवास :गेट वे ऑफ इंडिया येथून मांडवा, एलिफंटा या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी फेरीबोट चालवल्या जातात. या ठिकाणाहून वर्षभरात सुमारे साडेआठ लाख प्रवासी प्रवास करतात, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खेरांनी दिलीय. गेट वे ऑफ इंडिया वरून जलप्रवास करण्यासाठी 110 फेरीबोट महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे नोंदणीकृत आहेत. गेट वे येथून एलिफंटा जाण्यासाठी 80 बोटी आहेत, त्याद्वारे दररोज 20 ते 25 फेऱ्या मारल्या जातात. दर दिवशी दोन ते अडीच हजार प्रवासी एलिफंटासाठी प्रवास करतात. या फेरीबोटींची प्रवासी वहन क्षमता वेगवेगळी आहे.
फेरीबोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी : अपघातग्रस्त फेरीबोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची बाब समोर आलीय. त्यामुळे या अपघातानंतर प्रवासी फेरीबोटीमध्ये परवानगी दिलेल्या संख्येएवढ्याच प्रवाशांना प्रवास करण्याबाबत सक्ती करण्यात आलीय. आता नाताळ सण तोंडावर आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुट्टीचा कालावधी सुरू होत आहे. त्यामुळे या काळात गेटवर येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होते. तसेच एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतदेखील मोठी वाढ होते. त्यामुळे आता फेरीबोट चालकांना नियमानुसार प्रवाशांना बोटीत घ्यावे लागणार आहे. त्यामुळे फेरी बोट चालकांच्या फेऱ्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
व्हिडीओमुळे भीतीत वाढ : या अपघाताच्या व्हिडीओमुळे अपघाताची दाहकता अधिक वाढलीय. त्यामुळे प्रवाशांमध्ये काहीसे चिंतेचे आणि असुरक्षिततेचे वातावरण आहे. त्यामुळे काही काळ तरी या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांच्या मनातील भीती आणि धास्ती कायम राहण्याची शक्यता वर्तवली जातेय. गेट वे ऑफ इंडियावरील ताण लक्षात घेता नवीन जेट्टी उभारण्याची घोषणा राज्य सरकारने केली असून, सदर ठिकाणी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या जेट्टीवर 22 वॉटर टॅक्सी एकावेळी चालवता येतील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया वरील ताण कमी होऊ शकेल.
गेट वेला मोठ्या संख्येने पर्यटक येतात :या अपघातामुळे पर्यटकांमध्ये थोडीशी भीती पसरणे साहजिक आहे. त्यामुळे त्याचा काही अंशी फटका बसण्याची भीती आहे. गेट वेला मोठ्या संख्येने पर्यटक येतात, काही धाडसी पर्यटक दुसऱ्या दिवशीदेखील एलिफंटा पाहण्यासाठी गेले होते. परंतु काही प्रमाणात या अपघाताचा फटका पर्यटनाला बसण्याची नक्कीच भीती आहे, असंही गेट वे ऑफ इंडिया येथील फेरी बोट मालक वजीर बामणे म्हणालेत.
एलिफंटा बोट अपघातामुळे परिसरातील पर्यटनाला फटका बसण्याची भीती - NEELKAMAL BOAT ACCIDENT
एलिफंटा बोट अपघातामुळे या परिसरातील पर्यटनाला फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय, तसेच गेटवे ऑफ इंडियावरील ताण लक्षात घेता नवीन जेट्टी उभारण्याची घोषणा सरकारने केलीय.
एलिफंटा बोट अपघातामुळे पर्यटनाला फटका (Source- ETV Bharat)
Published : 11 hours ago