कोल्हापूर Maharashtra Budget 2024 : "लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधानांनी राज्यात १८ ठिकणी सभा घेतल्या होत्या. परंतु सभा घेतलेल्या ठिकणी महायुतीच्या १४ उमेदवारांचा पराभव झाला. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी राज्यात जास्तीत जास्त सभा घ्याव्यात," अशी खोचक टीका करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. शुक्रवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच शरद पवार यांनीदेखील अर्थसंकल्पावर कोल्हापूर इथं पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली.
अर्थसंकल्पाबाबत गुप्तता ठेवण्यात आली नाही : "राज्याचा अर्थसंकल्प मांडताना एक दिवस आधीच अर्थसंकल्पातील अनेक गोष्टी बाहेर आल्या होत्या. अर्थसंकल्पाबाबत गुप्तता ठेवायला पाहिजे ती ठेवली नाही. ज्या तरतुदी केल्यात, त्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केल्या आहेत. हा अर्थसंकल्प लोकांना काहीतरी भयंकर करतोय असं दाखवणारा आहे. प्रत्यक्ष या योजनाची अंमलबजावणी कशी होते, त्यावर अवलंबून आहे. या अर्थसंकलपामुळे मोठ्या प्रमाणात कर्ज वाढणार असून जनतेला काय मिळालं?" असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला.
महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार, हे जाहीर करण्याच्या मुद्द्यावरुन आपसात विसंवाद असल्याची साक्ष पटवणाऱ्या नेत्यांनाही पवारांनी एका वाक्यात शांत केलं. "विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रfपदाचा आमचा सामुदायिक चेहरा असेल," असा दावा पवार यांनी केला.
डाव्या विचारसरणीचे घटक आणि मोदी विरोधी सोबत घेणार : "लोकसभेला 48 पैकी 31 जागा आम्हाला मिळाल्या आहेत. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी आमच्या सोबत कोण येणार, काही माहिती नाही. अद्याप तसा काही प्रस्ताव नाही. मात्र, लोकसभेसाठी राज्यात 18 ठिकाणी पंतप्रधान मोदींनी सभा घेतल्या होत्या. त्यातील जागा आम्हाला मिळाल्या. आता आगामी निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात. डाव्या विचारसरणीचे घटक आणि मोदी विरोधींना विधानसभेसाठी सोबत घेणार आहोत," असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यातून त्यांनी विधानसभेला नव्या धोरणाबद्दल स्पष्ट संकेत दिले.