नवी दिल्ली/मुंबईNCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांना निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यामुळं शिवसेनेसारखाच राष्ट्रवादीचा निर्णय येऊ शकतो का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
15 फेब्रुवारीपर्यंत वेळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अपात्र ठरवण्याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात तीन आठवड्यांचा वेळ मागण्यात आला होता. मात्र, अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेत केवळ एका आठवड्याची मुदतवाढ देण्यात यावी, असा युक्तिवाद केला होता. त्यानंतर, सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देताना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. न्यायालयानं यापूर्वी राहुल नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते. आता राहुल नार्वेकर यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात 31 जानेवारीपर्यंत सुनावणी पूर्ण करू, पुढील तीन आठवड्यांचा वेळ निकालाचं लेखन करण्यासाठी मिळावा, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली. त्यानुसार राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्र प्रकरणी निर्णय घेण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत वाढवून मिळावी यासाठी विनंती अर्ज केला होता. त्यानुसार, त्यांना मुदतवाढ मिळाली आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाचा आधार घेत त्यांनी निर्णय दिला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह कोणत्या गटाचं याबाबतचा निर्णय या आठवड्यात येऊ शकतो. त्या निर्णयाचा आधार घेऊन विधानसभा अध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्र प्रकरणी निर्णय घेण्यास मदत होईल - अॅड. सिद्धार्थ शिंदे
निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता : सध्या राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्षांना जो वेळ मिळाला आहे, त्यावरून हा निकाल लागण्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय येण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी 8 डिसेंबरला पूर्ण झाली होती. तेव्हापासून अद्याप निवडणूक आयोगाचा निकाल जाहीर झालेला नाही. राहुल नार्वेकर यांना 15 फेब्रुवारीपर्यंतचा वेळ मिळाला आहे.