मुंबई :राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून बांद्रा येथे हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, सिद्दीकी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. त्यानंतर सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं. रविवारी रात्री बाबा सिद्दीकी यांना दफन करण्यात आलं.
शासकीय इतमामात दफनविधी :रविवारी दुपारी बाबा सिद्दीकी यांचं पार्थिव त्यांच्या बांद्रा येथील राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. अभिनेता सलमान खान, सोहेल खान, अर्पिता खान, उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, मंत्री आदिती तटकरे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांनी बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी अखेरची सलामी दिली व शासकीय इतमामात बाबा सिद्दीकी यांचा दफनविधी झाला.
राष्ट्रवादीचे नेते उपस्थित :अंत्यसंस्कारावेळी बडा कब्रस्तानमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. सिद्दीकी यांच्या अंत्ययात्रेत लाखो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राहत्या घरातून पार्थिव बाहेर काढतावेळी काही वेळ पाऊस देखील पडला होता.
अंत्यदर्शनाला 'व्हीआयपीं'ची रीघ : रविवारी सिद्दीकी यांचा मृतदेह पाली हिल येथील त्यांच्या 'मक्बा हाईटस' या इमारतीत आणण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येनं त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. बाबा सिद्दीकी हे हाय प्रोफाईल इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध होते. विविध पक्षांमध्ये त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं बॉलिवूड सेलिब्रेटी व राजकारणी व्यक्तींनी हजेरी लावली होती. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, बाबा सिद्दीकींचा मित्र अभिनेता सलमान खान, सना खान, मुफ्ती अनस, उर्वशी रौतेला, खासदार सुप्रिया सुळे, एम.सी.स्टॅन, लुलिया वंतूर, शुरा खान, अर्पिता खान, सोहेल खान, राज कुंद्रा, जरीन खान, पूजा भट्ट, जहीर इक्बाल, माजी खासदार प्रिया दत्त यांनी सिद्दीकी यांचं अंत्यदर्शन घेतलं. सिद्दीकी यांचं शवविच्छेदन कूपर रुग्णालयात करण्यात आलं. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल पटेल, नजीब मुल्ला, कॉंग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी भेट देऊन झिशानचे सांत्वन केले.