Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षचिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांना समज देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं दोन्ही गटांना 19 मार्च 2024 ला दिलेल्या न्यायालयाच्या मागील अंतरिम आदेशाचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले. तसंच शरद पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. त्यांनी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरावं, आणि अजित पवार गटानं न्यायालयाच्या निर्देशानुसार घड्याळ चिन्ह वापरावं, असंही न्यायालयानं म्हटलंय. अजित पवार गटानं कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं नसल्याचा आरोप करत शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
आजच्या सुनावणीत नेमकं काय घडलं : आजची सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर पार पडली. ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीनं सुनावणी सुरू होताच अजित पवार गटाकडून छापण्यात आलेल्या काही जाहिराती, पोस्टर्स, आणि सोशल मीडियावरील जाहिराती सादर केल्या. या जाहिरातींनध्ये घड्याळ चिन्हाबाबत डिस्क्लेमर देण्याचे न्यायालयानं दिलेले निर्देश पाळले गेले नाहीत. तसंच अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टानं 'घड्याळ' चिन्ह वापरण्याची परवानगी दिल्याचा दिशाभूल करणारा दावा केला.