बीड :गेले काही दिवसापासून संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं नाव संपूर्ण राज्यासह देशात गाजलं आहे. 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला. या खुनानंतर यात असलेल्या मारेकऱ्यांना अटक करण्यासाठी अनेक आंदोलनं झाली, मोर्चे झाले. यातील आठ आरोपींपैकी सात आरोपी अटकेत आहेत. मात्र कृष्णा आंधळे अजूनही फरारच आहे. या प्रकरणात आवादा कंपनी खंडणी प्रकरणात गुन्हा नोंद असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचं उघड झालं. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात येत आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा अन्यथा . . . :रविवारी आंबेजोगाई इथं जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण संजय दौंड यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यावेळी संजय दौंड यांनी, "मंत्री धनंजय मुंडे यांची बदनामी थांबवा नसता जशास तसं उत्तर देऊ. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, ही आमची देखील मागणी आहे. न्यायालय जे आरोपी सिद्ध करतील, त्याला नक्कीच फाशी झाली पाहिजे. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीत. अशा लोकांना फाशी झालीच पाहिजे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांची या प्रकरणात बदनामी थांबवा, अन्यथा आम्हालाही बदनामी करणाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितलं, की "पक्ष बांधणीसाठी आम्ही बैठक घेतलेली आहे. ज्या पक्षात जास्त कार्यकर्ते आहेत, तो पक्ष सत्ता गाजवतो. जास्त कार्यकर्ते असतील तर त्यांचा मुख्यमंत्री देखील होतो. आम्हाला अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचं आहे, म्हणून आम्ही आजपासूनच पक्षाची बांधणी करत आहोत," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.