कोल्हापूरKolhapur Ambabai Temple : -साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी आई अंबाबाई देवीचा शारदीय नवरात्रोत्सव 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. तत्पूर्वी मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता करण्याचं काम आजपासून सुरू झालं असून, मूळ उत्सवमूर्तीचे दर्शन सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत बंद ठेवण्यात आलंय. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने भाविकांची सोय व्हावी, यासाठी मंदिरातील महासरस्वती मंदिराजवळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आलीय. आज देवीच्या सोने-चांदीच्या अलंकारासह साहित्याची स्वच्छता करण्यात येत असून, गरुड मंडपाची प्रतिकृतीही उभारण्यात येत आहे. आज सायंकाळी आरती आणि सालंकृत पूजा झाल्यानंतर मूळ उत्सवमूर्ती दर्शनासाठी खुली होणार आहे.
देवीच्या सोने, चांदी व हिरेजडीत दागिन्यांची स्वच्छता :करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू असून, काल शनिवारी देवीच्या नित्य आणि उत्सव काळातील चांदीच्या दागिन्यांची तर आज रविवारी देवीच्या मौल्यवान हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवात देवीला नित्यालंकारामध्ये म्हाळुंग, बोरमाळ, कवड्याची माळ, पुतळ्याची माळ, ठुशी, कुंडल, 16 पदरी चंद्रहार, सोनं किरीट, बोरमाळ, कर्णफुले, मासोळी, चाफेकळी हार; कोल्हापुरी साज; मंगळसूत्र; 116 पुतळ्यांची माळ, लप्पा, सात पदरी कंठी हे सर्व दागिने देवीला परिधान करण्यात येत असतात. दागिने तब्बल 300 वर्षांपूर्वीचे असल्याने त्यांची निगा आणि स्वच्छ्तादेखील खूप काळजीपूर्वक करण्यात येत असते. यावेळी देवीच्या सोन्याच्या पालखीचीही स्वच्छ्ता करण्यात आलीय, 182 वर्षांचा इतिहास असलेल्या अंबाबाई मंदिराजवळील गरुड मंडप सध्या उतरवण्यात आला असून, याच गरुड मंडपाची प्रतिकृती नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात येत आहे.
नवरात्रोत्सव काळात मोठ्या प्रमाणात भाविक श्रीअंबाबाई मंदिरात दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने सुरक्षेची खबरदारी घेतली जात असून, त्यासाठी मंदिराच्या पूर्व, दक्षिण आणि उत्तर दरवाजावर बॅग स्कॅनर बसविण्यात आले आहेत. तर गाभाऱ्यापर्यंत जाणाऱ्या पूर्व दरवाजाबाहेर स्टीलचे बॅरिकेड्स बसविण्यात आले आहेत. देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतागृहे तयार करण्यात आली असून, भाविकांना उन्हाचा तडाका बसू नये यासाठी पंखा आणि दर्शन रांगेत भाविकांना देवीची पूजा, गाभाऱ्यातील विधी दिसावेत, यासाठी एलईडी स्क्रीनदेखील लावण्यात येत आहेत.
- शिवराज नायकवडे, सचिव पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती