महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मालखेडमधील अंबामंदिरात 659 घटांची स्थापना, अखंड ज्योती पाहून फिटते डोळ्यांचे पारणे

नवरात्रोत्सवात मालखेड गावातील अंबादेवी मंदिरात 659 घटांची स्थापना करून तितक्याच अखंड ज्योत तेवत ठेवण्यात आल्या आहेत. या मंदिराची आख्यायिका आणि मंदिराचे वैशिष्टय जाणून घेऊ.

navratri 2024   659  Ghatas thapana
अंबामंदिरात 659 घटांची स्थापना (Source- ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2024, 8:25 AM IST

अमरावती- चांदुर रेल्वे तालुक्यात येणाऱ्या भानामती नदीच्या काठावर जंगलानं वेढलेल्या परिसरात मालखेड गाव वसले आहे. या गावात शिवलिंग आणि शक्ती अर्थात अंबादेवी स्वयंभू प्रकटल्याची मान्यता आहे. ही अंबादेवी त्रेतायुगातील असल्याची आख्यायिका असून नवरात्रोत्सवानिमित्त प्राचीन अशा अंबादेवी मंदिरात 659 घटांची स्थापना करून तितक्याच अखंड ज्योत तेवत ठेवण्यात आल्या आहेत.



अशी आहे मंदिराची आख्यायिका-फार पूर्वी विदर्भाचा राजा असणाऱ्या वृषभदेव या राजाला दहा मुलं होती. या दहाही मुलांना राजधानीच्या लगत स्वतंत्र निवासस्थान बांधून देण्यात आली. दहापैकी एक असणाऱ्या केतुमल हा मुलगा ज्या ठिकाणी राहायचा त्या परिसराला मालकीतू असं नाव होतं. केतुमल देवीचा भक्त होता. त्याच्या भक्तीमुळे प्रसन्न होऊन अंबामाता प्रकटली. अंबामाताला धनसंपत्ती न मागता केतूम्मलानं भक्तांना दर्शन देण्याकरिता याच भागात वास्तव्य करावं, अशी इच्छा देवीकडे व्यक्त केली. केतुमालच्या इच्छेप्रमाणे देवी मालकेतू या गावात प्रकट झाली, असा उल्लेख भागवत पुराण आणि देवीपुराणमध्ये येतो. मालकेतू नावाचा अपभ्रंश होऊन पुढे या गावाचं नाव मालखेड असं पडलं. ज्या ठिकाणी अंबादेवी प्रकटली, त्या ठिकाणी पूर्वीपासूनच स्वयंभू शिवलिंग होतं. आज अंबादेवीचे मंदिर आणि शिवालय हे एकाच परिसरात असल्याची माहिती मालखेड येथील रहिवासी रवी कलाने यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

नवरात्रीच्या पर्वावर मंदिरात मोठा उत्सव (Source- ETV Bharat Reporter)



मुघलकालीन शैलीत मंदिर-मालखेड येथील अंबादेवी आणि शिवालय हे एकाच परिसरात आहेत. विशेष म्हणजे शिवालय हेमाडपंथी शैलीत बांधलं आहे. देवीचे मंदिर मात्र मुघल कालीन शैलीत उभारलेलं दिसतं. या मंदिराला चारही बाजूंना मुघलकालीन भिंत आणि भव्य प्रवेशद्वार आहे. मंदिराचा जिर्णोद्धार करताना काही जुना भाग पाडला असता दगडांवर कोरलेल्या विविध मूर्ती दिसून आल्या आहेत. त्याचबरोबर विविध आकारातील काही शिवलिंग आढळून आल्याची माहिती श्री अंबा शिव मंदिराचे अध्यक्ष वासुदेव देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

अंबादेवी स्वयंभू मंदिर (Source- ETV Bharat Reporter)



मंदिराच्या आवारात 659 अखंड ज्योत-नवरात्रीच्या पर्वावर या मंदिरात मोठा उत्सव असतो. 1997 पासून नवरात्रीच्या पर्वावर मंदिरात अखंड ज्योत लावण्याची प्रथा सुरू झाली. यावर्षी मंदिर परिसरात एकूण 659 गटांची स्थापना करून तितक्याच अखंड ज्योत लावण्यात आल्या आहे. या साऱ्या ज्योत पाहून डोळ्यांचं पारणे फेडतं. पहाटे तीन वाजतापासून हे मंदिर भाविकांसाठी उघडतं. रात्री अकरा वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता येते. मालखेडसह लगतच्या गावातील शेकडो भाविक नवरात्र निमित्तानं अंबादेवीच्या दर्शनाला येत आहेत.

हेही वाचा-

  1. पांडवांनी सातपुडा पर्वतात स्थापन केली देवी; आदिवासींची देवी अशी आहे ओळख - Navratri Festival 2024
  2. तुळजा भवानी मंदिरात अमावस्येला पेटतात हजारो मशाली; आपल्या गावात मशाल नेण्याची प्राचीन प्रथा, जाणून घ्या काय आहे प्रकार - NAVRATRI Festival 2024

ABOUT THE AUTHOR

...view details