महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून तब्बल दहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट - NASHA MUKT NAVI MUMBAI ABHIYAAN

'नशा मुक्त नवी मुंबई अभियान' कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज (२६ फेब्रुवारी) ४० गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले दहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.

Navi Mumbai Crime
अमली पदार्थ नष्ट (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2025, 7:55 PM IST

नवी मुंबई: नशा मुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत पोलिसांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली. त्यामुळं नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी छापे टाकून तिथून विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या अमली पदार्थांची नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून विल्हेवाट लावण्यात येतं असून तब्बल दहा कोटींचे अमली पदार्थ पोलिसांच्या माध्यमातून नष्ट करण्यात आले. मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या माध्यमातून हे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले.



अमली पदार्थांच्या तस्करी विरुद्ध कठोर पाऊल : आज, (२६ फेब्रुवारी) सकाळी महाराष्ट्र राज्यातील सुमारे १० कोटी रुपयांच्या किंमतीचे जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्याची कारवाई आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे उपस्थित होते.


अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी मंजुरी: महाराष्ट्र सरकार अंमली पदार्थांच्या तस्करी आणि वापरा विरुद्ध कठोर पावले उचलत आहे. अलीकडंच, १८ फेब्रुवारी २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी ३४६ नवीन पदांच्या निर्मितीला मंजूरी देण्यात आली. ज्यासाठी २२.३७ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. या उपक्रमांद्वारे, राज्य सरकार अंमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्याचा आणि समाजातील तरुण पिढीचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहे.



११४३ गुन्हे दाखल :नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून जवळपास दहा कोटींचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. नवी मुंबई आयुक्तालयामध्ये २०२३ आणि २०२४ या वर्षांमध्ये अमली पदार्थ सेवन आणि विक्री करणाऱ्यांवर जवळपास ११४३ गुन्हे दाखल झाले होते. यापैकी १७४३ आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये जवळपास १११ आफ्रिकन नागरिकांचा समावेश होता. या आफ्रिकन नागरिकांकडून ३८ कोटी रुपयांचं ड्रग जप्त करण्यात आलं. तसंच २०२३-२०२४ वर्षांमध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या ११३१ आफ्रिकन नागरिक आणि २२४ बांगलादेशी नागरिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असून जवळपास ११२८ आफ्रिकन नागरिकांना भारतातून हद्दपार करण्यात आलं आहे.


दहा कोटींचे अमली पदार्थ जप्त: शहरात 'नशा मुक्त नवी मुंबई अभियान' राबवण्यात येत आहे. यामध्ये ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेता जॉन अब्राहम याची खास नेमणूक करण्यात आली आहे. या कार्यक्रमांमध्ये नवी मुंबई परिसरातील शाळा, कॉलेज, सोसायटीमधील नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन जनजागृती करण्यात आली. तसंच अमली पदार्थांच्या अनुषंगानं नागरिकांना माहिती देण्याकरता 8828112112 हा हेल्पलाइन नंबर सुद्धा सुरू करण्यात आला. २०२४ मध्ये अमली पदार्थ विरोधी ३९ गुन्हात एकूण १ कोटी ८१ लाख रुपयांचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते. नशा मुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज (२६ फेब्रुवारी) मुंबई पोलीस आयुक्तालयातील ४० गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले दहा कोटींचे अमली पदार्थ वनमंत्री गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, यांच्या उपस्थितीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी तळोजा या ठिकाणी नष्ट करण्यात आले. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट ही कंपनी सरकार मान्य वेस्ट डिस्पोजल कंपनी असून या कंपनीमध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्या विविध विभागांचा वेगवेगळ्या प्रकारचा मुद्देमाल नष्ट करण्यात येतो.

हेही वाचा -

  1. कल्याण डोंबिवलीला 'उडता पंजाब' करणाऱ्या सौदागरांना ठोकल्या बेड्या; लाखोंचे अंमली पदार्थ जप्त
  2. मानवी तस्करीत तेलंगणाचा देशात पहिला क्रमांक, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक? - Day against Drug Abuse
  3. पठ्ठ्यानं पोस्टानं गुवाहाटीवरुन मागवलं चक्क हेरॉईन, क्रिप्टोकरन्सीमध्ये पेमेंट; पुढं काय घडलं? वाचा सविस्तर - Man Demands Heroin From Guwahati

ABOUT THE AUTHOR

...view details