नाशिक Nashik Tree Issue: नाशिकच्या गंगापूर रोडवर अडथळा ठरणारे वटवृक्ष महानगरपालिका हटवणार आहे. याबाबत जाहीर नोटीस मनपाने दिली आहे. नोटीसीद्वारे हरकत आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. या दरम्यान स्थानिक नागरिक, वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. यावेळी माजी नगरसेवक तथा उद्धव सेनेचे महानगरप्रमुख विलास शिंदे (Vilas Shinde) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पर्यावरण प्रेमींना धक्काबुकी आणि मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी विलास शिंदे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चर्चेचे रूपांतर वाद विवादात झाले: नाशिकच्या गंगापूर रोडवरील नवशा गणपती चौकातील रोडवर अडथळा ठरणारे, वटवृक्षाबाब महानगरपालिकाकडून सुनावणी ठेवण्यात आली होती. यावेळी दोन्ही बाजूंच्या लोकांचा युक्तिवाद सुरू होता. यावेळी उद्यान विभागाचे अधिकारी कर्मचारीही उपस्थित होते. अचानकपणे चर्चेचे रूपांतर वाद-विवादात आणि हाणामारीमध्ये झाले. यावेळी माजी नगरसेवक शिंदे यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी पर्यावरण प्रेमी जगबीर सिंग, मनोज साठे, आनंद रॉय, विशाल देशमुख यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानकपणे झालेल्या हल्ल्याने पळापळ होऊन गंगापूर रोडवर गोंधळ निर्माण झाला होता. यामुळं पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत हा वाद मिटवला. यानंतर पर्यावरण प्रेमींच्या तक्रारीवरून माजी नगरसेवक विलास शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माझ्यावर चुकीचा आरोप: गंगापूर रोड परिसरातील केवळ रस्त्यातील झाडे तोडण्याचा महानगरपालिकेचा प्रस्ताव होता. त्यावर सुनावणी असताना स्थानिक नागरिक जमले होते. झाडांमुळं होणारे अपघाताची माहिती असल्यानं ते सांगत असताना कथित वृक्ष प्रेमींनी विरोध केला. इतकेच नव्हं तर झाडांमुळं मृत्यू होत नाही तर दारू पिऊन मृत्यू झाले असे कथित वृक्षप्रेमींनी सांगितल्यानं नागरिक संतप्त झाले आणि तिथून वादाला सुरुवात झाली. मी सुरुवातीला वाद सोडवत असताना व्हिडिओ तयार करून तो आदित्य ठाकरे यांना पाठवण्यात आला. मी वृक्ष तोड करण्यासाठी आलो अशी चुकीची माहिती दिली. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले. स्थनिक नागरिकांच्या भावना दुखावतील अशी विधाने करण्याची गरज नव्हती असं विलास शिंदे यांनी सांगितलं.