नाशिकpatent for smart bag:आजच्या डिजिटल युगातही शाळेतील मुलांच्या पाठीवरील ओझं कमी झाल्याचं दिसत नाही. वह्या, पुस्तकं यासोबत डबा आणि पाण्याची बाटली, यामुळं दप्तराचं वजन वाढलेलंच आहे. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी वेगवेगळे उपक्रमही राबवले जातात. मात्र त्यावर अद्याप ठोस उपाय निघाला नाही. हीच बाब लक्षात घेऊन नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या होरायझन इंटरनॅशनल अकॅडमीतील नववीत शिकणाऱ्या संदेश मनोज जगताप या विद्यार्थ्यांनं एका 'डिजिटल स्मार्ट बॅग'चं डिझाईन तयार केलं आहे. भविष्यात ही बॅग विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासोबतच बॅगमध्ये असलेल्या जीपीआरएसमुळं मुलांच्या ठाव ठिकाण्याची माहितीमुळे सुरक्षिततेसाठी देखील मदत होणार आहे.
बॅग चाकाच्या मदतीनं ओढता येणार :प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना आणि पालकांना सतावणार प्रश्न म्हणजे विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं. हे पाठीवरचं ओझं कमी झालं पाहिजे यासाठी शासन विविध शैक्षणिक संस्थांकडून अनेक उपक्रम राबवते. त्याचाच एक भाग म्हणून नाशिकच्या नवीत शिकणाऱ्या संदेश जगताप या विद्यार्थ्यानं अनोख्या स्मार्ट बॅगचं डिझाईन तयार केलं आहे. ही बॅग वजनानं हलकी असेल. बॅग खांद्याला न लावता चाकाच्या मदतीनं सहज ओढत नेता येऊ शकतं. विद्यार्थ्याच्या पाठीवर असलेल्या दप्तराच्या अतिरिक्त वजनामुळं त्यांना होणाऱ्या मानेचे पाठीचे आजार देखील कमी करण्यास या स्मार्ट बॅगची मदत होईल. तसंच या बॅगमध्ये असलेल्या जीपीएसमुळे पालकांना देखील विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास संदेशनं व्यक्त केला.
एक वर्षांनी मिळालं पेटंट :संदेश म्हणाला, "एके दिवशी अचानक माझा खांदा दुखायला लागला. त्यानंतर मला वडिलांनी डॉक्टरांकडे नेलं. काहीतरी जड वस्तू उचलल्यामुळे खांदा दुखत असल्याचं डॉक्टरांनी वडिलांना सांगितलं. खांदादुखीचा मला बऱ्याच दिवस खूप त्रास झाला, एकदा ड्रॉइंग करताना माझ्या मनात विचार आला की, आपण अशी बॅग तयार करुया की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या खांद्यावरचं ओझं कमी होईल. त्यासाठी मी डिझाईन तयार केलं यात मला वडिलांनी देखील मार्गदर्शन केलं. मला आनंद आहे की, मला याचं पेटंट मिळालं."