नाशिक Nashik Simhastha Kumbh Mela: नाशिकमध्ये दर बारा वर्षानी 'सिंहस्थ कुंभमेळा' (Simhastha Kumbh Mela) होत असतो. यंदा 2026-27 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे. कुंभमेळ्यासाठी महानगरपालिकेनं यापूर्वी 11 हजार 600 कोटींचा आराखडा तयार करून शासनाकडं पाठवला होता. मात्र, त्यानंतर आता सुधारित आराखडा तयार करण्यात येणार आहे. जो 15 हजार कोटींचा असणार आहे. हा आराखडा दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.
15 हजार कोटीचा सिंहस्थ आराखडा : नाशिकमध्ये साधूग्रामसाठी घेण्यात येणाऱ्या सुमारे 300 एकर जमिनीच्या भूसंपादनासाठी साडेचार हजार कोटींचा जवळपास निधी लागणार आहे. तसंच रिंगरोडसह इतर ठिकाणी होणाऱ्या कामांची वाढ झाल्यामुळं आता नव्यानं सुमारे 15 हजार कोटी रुपयांचा सिंहस्थ आराखडा महानगरपालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिका आयुक्त आणि सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक झाली. आगामी कुंभमेळाबाबत केवळ कागदावरच नियोजन नको तर वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिला होत्या. त्यानंतर महानगरपालिका आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांनी तपोवन परिसरासह प्रत्यक्ष भेटीचा धडाका लावला आहे. त्यात शाही मिरवणूक मार्गाची पाहणी केली जात आहे.
अध्यक्षपदी गिरीश महाजन : कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर येऊन ठेपला असून तयारी मात्र, कागदावरच दिसून येत आहे. लोकसभा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य शासनाच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेनं सिंहस्थसाठी 11 हजार 600 कोटी रुपयांच्या विकास कामाचा प्राथमिक प्रारूप आराखडा तयार केला होता. त्यात एकट्या बांधकाम विभागाच्या सहा हजार कोटींच्या कामांचा समावेश होता. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू असल्यामुळं सिंहस्थ कुंभमेळ्याचं काम रखडलं होतं. लोकसभेचं मतदान होताच जिल्हाधिकारी शर्मा यांनी महानगरपालिका प्रशासनाला सिंहस्थ आराखड्याची बैठक बोलवण्याचे आदेश दिले होते. यंदा नाशिकच्या कुंभमेळा जबाबदारी गिरीश महाजनांवर देण्यात आली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्षपद देण्यात आलं आहे.