नांदेड : मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोन तरुणावर काळानं घाला घातला. जाळे टाळण्यासाठी तळ्यात उतरलेल्या दोघांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे दोघजण तलावात बुडाले. ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील गडग्याळवाडी येथे शनिवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. दरम्यान, दोन्ही तरुणांपैकी संतोष हणमंतराव मामीलवाड (वय 27) याचा मृतदेह सापडलाय. तर अजित विश्वाबंर सोनकांबळे (वय 23) याचा रेस्क्यू टीमकडून शोध घेतला जातोय.
नेमकं काय घडलं? : मुखेड येथील तरुण अजित सोनकांबळे आणि गडग्याळवाडी येथील संतोष मामीलवाड 18 जानेवारी रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास गडग्याळवाडी येथील तलावात जाळं घेऊन मासे पकडण्यासाठी गेले होते. दोघंही कपडे, चप्पल आणि मोबाईल काढून तळ्याच्या पाण्यात उतरले. मात्र, मासे पकडत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यातच एकाचा जाळ्यात पाय अडकून पाण्यात बुडाला. तर दुसरा बेपत्ता झाल्याचं सांगितलं जातंय. घटनेची माहिती मृत तरुण संतोष मामीलवाड याच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर तहसीलदार राजेश जाधव, पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे, पोलीस कर्मचारी व्यंकट जाधव, रुकेश हासुळे, तलाठी यांनी घटनास्थळी जात घटनास्थळाची पाहणी केली.