महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राला गुजरातमध्ये तारण ठेवण्याचे प्रयत्न सुरू- नाना पटोलेंची महायुतीवर घणाघाती टीका - Maharashtra Assembly elections - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTIONS

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेसनं अमरावतीत आज आढावा बैठक घेतली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय. "राज्य सरकार कर्ज काढून महाराष्ट्राला बरबाद करत आहे. महाराष्ट्राची ओळख बेरोजगारांचा महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्यांचा महाराष्ट्र झाला," अशी घणाघाती टीका यावेळी पटोले यांनी केली.

Nana Patole
नाना पटोले (ETV BHARAT File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 8:02 PM IST

अमरावती : "मुख्यमंत्री पदापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान तसंच महत्त्व जपण्यावर आमचं मुख्य लक्ष्य आहे. महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण होणार? हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीत काँग्रेसचं मोठं योगदान आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या मंगल कलशानं याची सुरुवात झाली. राष्ट्रीय तसंच जागतिकस्तरावर महाराष्ट्राला विकासाच्या दृष्टीनं पुढं नेण्याचं काम वसंतराव नाईक यांच्यापासून काँग्रेसच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी केलंय. मात्र, महाराष्ट्राला गुजरातमध्ये तारण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असा हल्लाबोल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर केलाय. ते आज अमरावतीत पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाना पटोलंची राज्य सरकारवर टीका (Source- ETV Bharat)

आमदारांमधून होणार मुख्यमंत्री : "लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाची संसदीय बैठक न होता थेट राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बैठक घेऊन पंतप्रधानांचं नाव घोषित करण्यात आलं. भाजपामध्ये लोकशाही नाही, असं भाजपाचे नेते राजीव प्रताप रुडी यांनी बोलताना मला सांगितलं. आम्ही मात्र लोकशाही मार्गाला महत्त्व देणारे आहोत. आमचे आमदार निवडून येतील. त्यामधूनच आमचा मुख्यमंत्री निवडला जाईल. इकडं महाराष्ट्रातदेखील लाडकी बहीण योजनेप्रमाणं लाडकी खुर्ची अभियान राज्य शासनातील तिन्ही पक्ष राबवीत आहेत," अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केली.

काँग्रेसच्या पाठीशी जनता : "लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात जनतेनं काँग्रेसला साथ दिली. अगदी तसंच चित्र आता विधानसभा निवडणुकीतदेखील राहील," अशी आशा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. "लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये आमच्या विरोधात मोठा नेता असतानादेखील नांदेडच्या जनतेनं मात्र काँग्रेसच्या बाजूनं कौल दिला. काँग्रेसमधून कोणी नेता गेला तरी फरक पडत नाही. हेदेखील नांदेडच्या निकालावरून स्पष्ट झालं. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय योजना जाहीर करून आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्य सरकारनं घेतलं आहे. आज महाराष्ट्र अडाणीला दान देण्याचं काम राज्य सरकार करीत आहे. मात्र, जोपर्यंत काँग्रेसचे विचार जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लागू देणार नाही," असा निर्धार विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

लोकसभेतील यशाकरिता जनतेचा आभार : " लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात मोठं यश मिळालं. अमरावतीत अतिशय कठीण परिस्थिती असतानादेखील काँग्रेसचं यश कौतुकास्पद आहे. अशा कठीण परिस्थितीत काँग्रेसला साथ देणाऱ्या अमरावतीच्या जनतेचे आम्ही आभार व्यक्त करतो," असं विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. "महाराष्ट्रात खोक्यांचं केलेलं राजकारण जनता विसरली नाही. सध्या राज्यात बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार काम करीत आहे. केवळ पैसा कमावणं हाच सत्ताधाऱ्यांचा उद्देश आहे. मुंबईसह राज्यातील मोक्याच्या जमिनी 'अदानी'सारख्या उद्योगपतींना विकण्याचा घाट राज्य शासनाचा आहे. यामुळंच आता विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना 100 पेक्षा कमी जागांवर समाधान मानावं लागेल. आम्ही 180 पेक्षा अधिक जागांवर विजयी होऊ," असा विश्वासदेखील बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

  • विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नथला, मुकुल वासनिक, अविनाश पांडे, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आदी उपस्थित होते.

'हे' वाचलंत का :

  1. लोकसभेच्या पाठोपाठ विधानसभेत सुद्धा भाजपाला 'फेक नॅरेटिव्ह'ची चिंता - BJP in tension about fack narrative
  2. ...‘त्यांना’ राज्यात दंगली घडवायच्यात; मनोज जरांगेंचा फडणवीस आणि भुजबळांवर आरोप - Manoj Jarange Patil
  3. उद्या मार्मिक आमचा आहे, असं कोणी म्हणेल- नाव न घेता उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला - Uddhav Thackeray News

ABOUT THE AUTHOR

...view details