नागपूर Metro Run For Save Parrot: मकर संक्रातीचा सण संपून महिना लोटला आहे. मात्र, पतंगबाजीच्या जीवघेण्या पाऊलखुणा अजूनही कायम आहेत. किंबहुना पक्षांसाठी त्या मृत्यूचा सापळाच ठरत आहेत. नागपूर शहरातील कामठी मार्गावर असलेल्या मेट्रोच्या पुलावरील रेलिंग (सुरक्षा कठडे) मध्ये गुंडाळलेल्या मांज्यात एक पोपट अडकला होता. रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना ही रेस्क्यू करणं अश्यक्य असताना, चक्क मांजात अडकलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी मेट्रो धावली आणि त्या पोपटाचा जीव वाचवला.
पोपट मांजामध्ये अडकल्याची माहिती पक्षीप्रेमींनी आम्हाला दिली होती. त्यानंतर लगेच वरिष्ठांशी चर्चा करण्यात आली. मानवीय दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन लगेच एक मेट्रो ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मांज्यात अडकलेल्या पोपटाला वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली. - अखिलेश हळवे,सीनियर डीजीएम, कार्पोरेट कम्युनिकेशन डिपार्टमेंट, महामेट्रो
मांज्यात अडकला पोपट : ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली आहे. त्याचं झालं असं की, गड्डीगोदाम भागातील मेट्रोच्या पुलावरील सुरक्षा कठड्यात गुंडाळलेल्या मांज्यात एक पोपट अडकला होता. यासंदर्भातील माहिती रेस्क्यू पथकाला समजली. तेव्हा त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून मांज्यात अडकडलेल्या पोपटाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पण दुर्दैवानं तो पोपट ज्या ठिकाणी अडकलेला होता. तिथपर्यंत रेस्क्यू पथकाला पोहोचता येत नव्हतं.
पोपटापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न :रेस्क्यू पथक अपयशी ठरल्यानंतर, अग्निशमन दलास घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न सुरू केले. मात्र, दुर्दैवानं ते सुद्धा पोपटापर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यांची शिडी तिथपर्यंत जात नसल्यानं त्यांचा नाईलाज झाला होता. पोपटापर्यंत पोहोचण्याचे सगळे रस्ते बंद झाले असं वाटतं असताना, एका तरुणानं समयसूचकता दाखवत थेट मेट्रो स्टेशन गाठलं.