नागपूर Muslim Karsevak : 1992 साली अयोध्येतील बाबरीचा वादग्रस्त ढाचा कारसेवकांनी पाडला होता. या घटनेला आता 32 वर्ष लोटली आहेत. यात अनेक कारसेवकांनी आपला जीव देखील गमावला होता, तर काही सुखरूप परत आले होते. हजारोच्या संख्येनं अयोध्येला गेलेल्या या कारसेवकांमध्ये एक अशी व्यक्ती होती, ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
एकमेव मुस्लिम कारसेवक : सर्व जाती-धर्माचं बंधन झुगारून 14 वर्षीय (वय 1992 प्रमाणे) फारुख शेख कारसेवेत सहभागी झाले होते. आज त्याचं वय 46 असून त्या दिवशी अयोध्येत घडलेली प्रत्येक प्रसंगाबाबत त्यांनी थरारक अनुभव सांगितले. धर्मानं मुस्लिम असल्यानं त्या दिवशी कारसेवकांचा जमाव त्यांचा शोध घेत होता. त्यावेळी दिवंगत प्रभाकरराव दटके यांनी फारुख यांचा जीव वाचवला होता, तसंच साध्वी ऋतुंबरा यांनी त्यांचं स्वागत केलं होतं.
तिथे मंदिराचे पुरावे दिसत होते : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी ढाचाचं माझ्या डोळ्यांनी मी निरीक्षण केलं, तेव्हा हा बाबरीचा ढाचा नसून मंदिराचा ढाचा असल्याचं माझ्या लक्षात आलं होतं. अनेक पुरावे तिथं दिसत होते. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं देखील यावर शिक्कामोर्तब केलंय, आता प्रत्येक मुस्लिमानं ते मान्य केलं पाहिजे, असं फारुख शेख म्हणतात.
'तो' जमाव माझ्या जीवावर उठला होता : फारुक शेख जेव्हा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते, त्यावेळी अयोध्येत देशभरातून कारसेवक आले होते. कारसेवकांच्या गर्दीत मुस्लिम मुलगा असल्याची माहिती कळल्यावर त्यावेळी तेथील सर्व लोकांनी संताप व्यक्त केला होता. त्यांना माहितीचं नव्हतं की, मी देखील एक कारसेवक आहे. लोकं माझ्या जीवावर उठले होते, मला जीवे मारण्यासाठी प्रयत्न झाले होते, असं शेख यांनी सांगितलं.