मुंबई CM Eknath Shinde: मुसळधार पावसानं देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा ठप्प झालीय. मुंबईत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं मुंबईकरांचा मुख्य आधार असलेली उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस आज सोमवारी सकाळी सात वाजेपर्यंत सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलंय.
मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर : पावसामुळं अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी लोकल सेवा धीम्या गतीनं सुरू आहे. जी परिस्थिती रेल्वे रुळांवर आहे, तीच परिस्थिती मुंबईतील भुयारी मार्ग आणि रस्त्यांवर देखील आहे. त्यामुळं गाड्यांच्या देखील लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आठवड्याच्या सुरुवातीलाच कामावर जायला उशीर होऊ नये यासाठी मुंबईकर धडपडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे देखील ॲक्शन मोडवर आले असून, मुख्यमंत्र्यांनी आज अचानक महानगरपालिका मुख्यालयाला भेट देऊन येथील आपत्ती नियंत्रण कक्षात मुंबई शहरातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला.
एनडीआरएफची टीम तयार आहे : मुसळधार पावसामुळं मुंबईतील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती नियंत्रण कक्षात उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, रविवारी रात्रीपासून मुंबईत 300 मिमी पाऊस पडला आहे. यामुळं जवळपास मुंबई शहर ठप्प झाल्याची स्थिती आहे. मुंबईत परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी मी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या मुंबईत सुमारे 200 रेल्वेचे पाणी उपसा पंप आणि 400 हून अधिक महानगरपालिकेचे पाणी उपसा पंप सखल भागात साचलेले पाणी काढण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहेत. मध्य आणि हार्बर मार्गावर गाड्या पुन्हा सुरू झाल्या आहेत. अगदीच काही परिस्थिती उद्भवलीच तर एनडीआरएफच्या टीम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, सैनिक, नौदल आणि हवाई दल सतर्क आहेत.
"एकाच वेळी एवढा पाऊस झाल्यानं त्याचा निचरा होण्यासाठी वहन क्षमता तयार केली जात आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या होल्डींग पाँण्डस्मुळे यंदा मिलन सबवे, हिंदमाता भागात पाणी साचले नाही. मायक्रो टनेलिंग सारखा प्रयोग देशात पहिल्यांदा केल्यामुळं निचरा होण्यासाठी मदत होत आहे. सकाळपासून मी रेल्वे, मुंबई महापालिका, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, मुंबई पोलिस आयुक्त यांच्या संपर्कात राहून परिस्थितीची माहिती घेत आहे". - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
सात ठिकाणी पंपिंग स्टेशन : मुंबईतील सुमारे ५००० ठिकाणांवर मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवण्यात येत आहे. मुंबई महापालिकेचे अधिकारी फिल्डवर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मिठी नदीच्या ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात येत असून त्यामुळं भरतीच्या वेळेस समुद्राचे पाणी शहरात येणार नाही. पंपाने साचलेले पाणी नदीत टाकण्याची यंत्रणा करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईत सात ठिकाणी पंपिंग स्टेशन करण्यात येत असून नागरिकांना मदतीसाठी यंत्रणा सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
अजित पवार यांचं आवाहन: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नागरिकांना आवाहन केलं आहे. अजित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, काल रात्री मुंबईत सहा तासांमध्ये 300 मिमी पाऊस पडला आहे. हा मुंबईत वर्षभरात जेवढा पाऊस पडतो त्याच्या १० टक्के पाऊस आहे. भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. हवामान बदलामुळं भविष्यात येणाऱ्या पर्यावरणीय समस्या लक्षात घेऊन आपण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. वर्षातील 365 दिवस दुष्काळ, पूर, वादळ यांचा सामना करण्यासाठी आपण योग्य ती पावले उचलली पाहिजे. त्यासोबतच अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजे.
हेही वाचा -
- मुंबई पुन्हा तुंबली; पावसाला तोंड देण्यास बीएमसी आणि रेल्वेची यंत्रणा अपयशी - Mumbai Heavy Rain
- मुंबईसह कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा; रायगडावर अडकलेल्या शेकडो पर्यटकांची सुटका, मुख्यमंत्र्यांचं मुंबईकरांना आवाहन - Maharashtra Rain Update