मुंबई Mumbai Rain Updates : मुंबई आणि मुंबई उपनगरात रात्रीपासूनच जोरदार पाऊस कोसळतोय. यामुळं मुंबईच्या अनेक भागात पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईतील वरळी, दादर, चुनाभट्टी , कुर्ला, सायन, कांदिवली, बोरिवली, अंधेरी, बांद्रा, सांताक्रुज, गोरेगाव वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील ओबेरॉय मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. त्यामुळं अनेक वाहनं पाण्याखाली अडकली आहेत. तसंच मालाड मीठ चौकी लिंक रोड, गोरेगाव लिंक रोडवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. तर बांगूर नगर लिंक रोडवर झाड कोसळल्यामुळे लिंक रोड बंद करण्यात आलाय.
मुंबईत पावसाचा जोर वाढला (Source reporter)
लोकल सेवा कोलमडली : मुसळधार पावसामुळं मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची सेवा ठप्प झाली. भांडूप रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्यामुळं ठाण्यापासून पुढं लोकल सुरू झालेली नाही. पश्चिम रेल्वेच्या दादर, बांद्रा, माहीम स्थानक परिसरात रुळावर पाणी साचल्यानं लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावली आहे. तसंच रुळांवर पाणी आल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे.
आज शाळांना सुट्टी जाहीर : मुंबई महानगरात मध्यरात्रीनंतर 1 वाजल्यापासून ते आज (8 जुलै) सकाळी 7 वाजेपर्यंत या सहा तासांच्या कालावधीत विविध ठिकाणी 300 मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झालीय. सखल भागांमध्ये जोरदार पावसामुळं पाणी साचलं असून उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगरातील सर्व महानगरपालिका, शासकीय आणि खासगी माध्यमांच्या शाळांना तसंच महाविद्यालयांच्या पहिल्या सत्रासाठी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खूपच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी 1916 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं बीएमसीकडून आवाहन करण्यात आलंय.
(7 जुलै 2024) सकाळी 8 वाजता ते आज (8 जुलै 2024) सकाळी 6 वाजता या 22 तासांच्या कालावधीत मुंबईतील पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे.
- शहर- 110.10 मिलिमीटर
- पूर्व उपनगरे- 150.53 मिलिमीटर
- पश्चिम उपनगरे- 146.35 मिलिमीटर
हेही वाचा -
- शहापूर तालुक्यात पुराचं थैमान, पुरामध्ये अडकलेल्या दिडशेहून अधिक पर्यटकांना एनडीआरएफच्या पथकानं वाचवलं; शेकडो घरं पाण्याखाली - Heavy Rain in Thane
- मुंबईला पावसाचा तडाखा! ट्रॅकवर झाड कोसळल्यानं मध्य रेल्वेची सेवा साडेपाच तास विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा - Central Railway News
- सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला, ओढ्याच्या पाण्यात वृध्द गेला वाहून - Satara News