मुंबईSummons issued to Anil Desai: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं शनिवारी समन्स बजावलं. अनिल देसाई यांना 5 मार्चला चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे गटानं बँक खात्यात वळवले पैसे : निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून घोषित केल्यानंतरही उद्धव ठाकरे गटानं पक्षनिधीतून 55 ते 60 कोटी रुपये उद्धव ठाकरे यांच्या नव्या बँक खात्यात वळवल्याचा आरोप आहे. त्याबाबत शिवसेना शिंदे गटाचे सचिव संजय मोरे यांनी ईओडब्ल्यूकडं तक्रार केली होती. याप्रकरणी अनिल देसाई यांना चौकशीसाठी हजर राहण्याकरिता समन्स बजाविण्यात आलं आहे.
आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप :शिंदे गटाच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेनं उद्धव ठाकरे गटाविरुद्ध प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं प्राथमिक तपासाची चक्रे फिरवली आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचा हवाला देत लेखी तक्रार दाखल केली. फेब्रुवारी 2023मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला बगल देत उद्धव ठाकरे गटानं अधिकृत असलेल्या शिवसेनेच्या बँक खात्याचं टीडीएस आणि प्राप्तिकर विवरणपत्र भरल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
विवेक फणसळकर यांच्याकडे लेखी तक्रार :याबाबत शिवसेनचे सचिव संजय मोरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरून फसवणूक केल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पक्षाच्या खात्यातून पैसे काढण्याबाबतची माहिती मागविली आहे. तसंच बँकेत झालेल्या व्यवहारांचा तपशील बँक अधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आर्थिक गुन्हे शाखेने आयकर विभागाला पत्र लिहून शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) कर भरणाबाबत तपशील मागवला आहे.
हे वाचलंत का :
- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्राला स्थान नाही
- भाजपानं विश्वासघात केला, संजय राऊतांची देवेंद्र फडणवीस, अमित शाह यांच्यावर टीका
- राहुल गांधींनी आधी काँग्रेस पक्ष सावरावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला