मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईमधील उपनगरातील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांच्या विरुद्ध ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात लढत पाहायला मिळाली. दोघांतील लढत शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीपर्यंत ठरली. मतमोजणीत कधी वायकर आघाडीवर होते, तर कधी कीर्तीकर आघाडीवर होते. मात्र शेवटी 48 मतांनी रवींद्र वायकर यांनी बाजी मारत विजय खेचून आणला.
मुलगा ठाकरेंसोबत तर वडील शिंदेंसोबत : अमोल कीर्तिकर यांनी पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची साथ दिली. त्याचं फळ त्यांना मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल कीर्तिकर यांच्यावर विश्वास ठेवत उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अमोल कीर्तिकर यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. गजानन कीर्तिकर यांनी मात्र रवींद्र वायकर यांचा प्रचार केला होता. त्यामुळं या ठिकाणची लढत चांगलीचं रंगल्याचं पाहायला मिळालं.
48 मतांनी निसटता विजय : सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत रवींद्र वायकर यांनी आघाडी घेतली होती. तर त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेतली होती. पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सर्व फेऱ्या होईपर्यंत मतमोजणीच्या दरम्यान आघाडी पिछाडीचा खेळ पाहायला मिळाला. शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठा लागलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांबरोबरच कार्यकर्त्यांचीदेखील धाकधूक वाढली होती.अखेर या अटीतटीच्या लढतीत वायकर यांना 4 लाख 52 हजार 644 तर किर्तीकर यांच्या पारड्यात 4 लाख 52 हजार 596 इतकी मतं पडली. यामध्ये वायकर यांचा अवघ्या 48 मतांनी निसटता विजय झाला. नोटा 15161 तर वंचित उमेदवार परमेश्वर रनशूर 6052 मते मिळाली. 26 फेऱ्या आणि टपालीमत पत्रिकांच्या निकालानंतर मुंबई उत्तर पश्चिममधील विजय उमेदवार घोषित करण्यात आला.