मुंबई Mumbai Road Accident :अचानक एखादी दुर्घटना झाली आणि आईवडील गमवावे लागले की लहान मुलं ही कायमची पोरकी होतात. लहान मुलांना आईवडिलांचा आधार असणं गरजेचं आहे. आईवडील नसले तर लहान मुलांचा आधारच निघून जातो. असंच काहीसं एका 11 वर्षांच्या मुलीसोबत घडलं. एका दुर्दैवी अपघातात या मुलीला तिची आई गमवावी लागली. परंतु त्या नुकसानाची दखल घेत मोटार अपघात दावा न्यायाधिकरणातर्फे तिला 1.1 कोटी रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आलीय.
नेमकं प्रकरण काय? :रितिका अशोकन या 11 वर्षीय मुलीला रस्ते अपघातात तिची आई गमवावी लागली. रितिकाची आई सीता अशोकन यांच 2015 मध्ये माझगाव येथील एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. आता नऊ वर्षांनंतर या मुलीला 1.1 कोटी रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. आता ही मुलगी 11 वर्षांची असून तिला नुकसानभरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाकडुन देण्यात आले आहेत. रितिकाच्या वडीलांचं आणि आजोबांचं या दाव्याचा निकाल येण्यापूर्वीच निधन झालं. रितिका सध्या तिच्या वृध्द आजीसोबत राहते. रितिकाची आई सीता अशोकन या अपघातावेळी 37 वर्षांच्या होत्या. त्या कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षिका होत्या. त्यांना दरमहा 60 हजार रुपये उत्पन्न मिळत होते. त्यांना मिळत असलेल्या उत्पन्नाचा या दाव्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी नुकसान भरपाई देताना गांभीर्यानं विचार केलाय. 11 मे 2015 रोजी सीता अशोकन त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून जात असताना वेगाने जाणाऱ्या ट्रेलरनं त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली होती त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. धडक देणाऱ्या वाहनाचा मालक आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीनं नुकसान भरपाईची रक्कम रितिकाला द्यावी, असे निर्देश न्यायाधिकरणानं दिले आहेत.