मुंबई -मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे अनेक लोक स्वप्न घेऊन येतात, त्यातील काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो. याच मुंबईत अगदी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्या लोकांपासून ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपर्यंत अनेक करोडपती राहतात. मात्र, आता हेच करोडपती कर बुडवे असल्याचं समोर आलंय. महानगरपालिका सगळ्यांकडूनच प्रॉपर्टी टॅक्स आकारते. त्यातील सामान्य माणसांनी आपला मालमत्ता कर भरलेला असून, काही करोडपती लोकांनी अद्याप मालमत्ता कर भरला नसल्याचं उघड झालंय. आता बृहन्मुंबई महापालिकेने या टॉप 10 करबुडव्यांची यादीच प्रसिद्ध केलीय.
मालमत्ता धारकांना सध्या नोटिसा बजावणं सुरू :पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मालमत्ताकर थकवणाऱ्या मालमत्ता धारकांना सध्या नोटिसा बजावणं सुरू असून, बृहन्मुंबई महापालिकेने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून मालमत्ता कर न भरलेल्या 3605 मालमत्ता जप्त केल्यात. मालमत्ता जप्त केल्यानंतर देखील या प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्यांनी आपल्या मालमत्ता कर न भरल्यास मालमत्तांचा लिलाव केला जाणार असल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिलीय. तर काही मालमत्तांचा लिलाव सुरू करण्यात आल्याचंदेखील पालिकेनं म्हटलंय.
6 हजार 200 कोटी रुपये कर संकलन उद्दिष्ट :कर निर्धारण आणि संकलन विभागाने वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षात 6 हजार 200 कोटी रुपये कर संकलन उद्दिष्ट निश्चित केलंय. त्या दृष्टीने पालिकेची विविध पातळ्यांवर कारवाई सुरू आहे. निर्धारित कालावधीमध्ये कर भरणा करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आर्थिक क्षमता असूनही मालमत्ताकर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांना कलम 203 अन्वये जप्तीची नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय. विहीत मुदतीत कर भरणा न केल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधित मालमत्तेवर कलम 203, 204, 205, 206 अन्वये प्रथमतः मालमत्तेतील महागड्या वस्तू जप्त करून लिलाव केला जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक 2592/2013 च्या अंतरिम आदेशान्वये येणारा कर वसूल न झाल्यास मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिलीय.