महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुधारणेची संधी मिळण्यासाठी 20 वर्षीय आरोपीला बलात्कार प्रकरणी जामीन, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय - HIGH COURT ON MINOR GIRL RAPE CASE

14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 20 वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.

Mumbai High Court
मुंबई उच्च न्यायालय (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2025, 10:41 PM IST

मुंबई: 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बलात्कार केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या 20 वर्षीय तरुणाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मिलींद जाधव यांनी हा निकाल दिला. आरोपीला 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला.
या प्रकरणातील आरोपी 20 वर्षांचा आहे. त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अल्पवयीन तरुणीवर केला होता बलात्कार: आरोपी 15 ऑगस्ट 2023 पासून तुरुंगात आहे. त्याच्याविरोधात भादंवि कलम 363, 376(2) (f) (j) (n) व 376 (3) अन्वये आणि पॉक्सोच्या कलम 4, 6, 8 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. पीडित तरुणी अनाथ असून त्याच्या काकांच्या घरात बहिणीसोबत राहते. आरोपी हा तिचा चुलत भाऊ आहे. एप्रिल ते मे 2023 या कालावधीत तीन वेळा या आरोपीने साडे चौदा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला. त्यामध्ये पीडित मुलगी गरोदर राहिली. पीडित मुलगी शाळेत जायची बंद झाल्यानंतर तिची मैत्रिण तिच्या घरी आली आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.

प्रकरणात जामीन : या प्रकरणी दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायमुर्तींनी या प्रकरणात आरोपीचे कमी वय लक्षात घेता या तरुणाला तुरुंगात ठेवल्यास केवळ त्याला दंड दिल्यासारखे होईल आणि त्याला सुधारणेची संधी नाकारल्यासारखी परिस्थिती होईल, असं निरीक्षण नोंदवलं. केवळ दंड-शिक्षा करण्याऐवजी सुधारण्याची संधी मिळाल्यास हा आरोपी पुढील आयुष्यात सुधारु शकतो, असं मत न्यायालयानं व्यक्त केलं. आरोपीला जामीन नाकारल्यास त्याची पावले गुन्हेगारीकडं वळण्याची आणि त्याचं आयुष्य बिघडण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळं या प्रकरणात जामीन दिला जात असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. न्यायालयाच्या परवानगी शिवाय आरोपीने राज्याबाहेर जावू नये, खटल्याच्या सुनावणीला हजर राहावे, पोलीस स्थानकात नेमून दिलेल्या वेळी हजर राहावं अशा विविध अटी आरोपीवर लादण्यात आल्या आहेत.

न्यायालयासमोर सादर केलं प्रतिज्ञापत्र :वर्षभरापूर्वी पीडित मुलीने या प्रकरणात आरोपीला विनाशर्त जामिनावर सोडण्यास आपली हरकत नसल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयासमोर सादर केलं होतं. असं प्रतिज्ञापत्र देण्यासाठी आपल्यावर कोणाचाही दबाव नसल्याचं तिच्याकडून सांगण्यात आलं होतं.

हेही वाचा -

  1. बलात्कार करुन महिलेची हत्या; २५ वर्षीय आरोपीला अटक
  2. मित्राचा मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार; व्हिडिओ काढत व्हायरल करणाऱ्या जोडप्यालाही अटक
  3. "आम्हाला खटला लढायचा नाही", ठाणे बलात्कार-एन्काउंटर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी घेतली माघार

ABOUT THE AUTHOR

...view details