मुंबई Ghatkopar Hoarding Accident : सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुंबईत धुळीचं वादळ आणि पाऊस बरसल्यानं काही ठिकाणी पडझड झाली होती. त्याचवेळी घाटकोपर येथील छेडा नगर येथे असलेलं एक भलं मोठं 120 बाय 120 साईजचं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्यानं 14 लोकांना आपला जीव गमावावा लागला. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) आणि इतर अज्ञात तिघांच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा भारतीय दंड संविधान 304, 338, 337 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली. मात्र, भावेश भिंडे हा आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्यानं त्याचा माग काढण्यासाठी मुंबई पोलिसांनी सात पथकं तयार केली असल्याची माहिती, सूत्रांनी दिलीय.
भावेश विरोधात बलात्काराचा गुन्हा : आरोपी भावेश भिंडे हा महाराष्ट्राबाहेर पळाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. 23 पेक्षा जास्त गुन्हे असलेला आरोपी भावेश भिंडे याने 2009 मध्ये मुलुंड मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीवेळी त्याने निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करून त्याच्यावर असलेल्या गुन्ह्यांची इत्यंभूत माहिती दिली होती. त्यामुळं 2009 पर्यंत भावेश भिंडे याच्यावर 23 गुन्हे दाखल होते. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये देखील भावेश विरोधात बलात्काराचा गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
अपक्ष उमेदवार म्हणून लढवली निवडणूक : आरोपी भावेश भिंडे याच्या विरोधात एमएमसी अॅक्ट कलम 471 आणि 328 अन्वये कारवाई करण्यात आली होती. अशा प्रकारे 23 प्रकरण भावेश भिंडेविरोधात असून महापालिकेने त्याच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. जानेवारी 2024 मध्ये भावेश भिंडे विरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा एक गुन्हा दाखल होता. पोलिसांनी भावेश भिंडे विरोधात आरोपपत्र दाखल केलंय. त्याच्याविरुद्ध बृहन्मुंबई महानगर पालिकेनं अनेक एफआयआर नोंदवले आहेत. भिंडे याने 2009 मध्ये मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. यावेळी भावेश भिंडेने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यानं सांगितलं होतं की, 2009 मध्ये त्याच्यावर 23 गुन्हे दाखल होते. ही सर्व प्रकरणे चेक बाऊन्ससाठी मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत आहेत.
होर्डिंग कोसळल्यानं 14 लोकांचा बळी : मागील दशकात होर्डिंग्ज आणि बॅनर्ससाठी अनेक रेल्वे आणि बीएमसी कॉन्ट्रॅक्ट्स भिंडे यानी मिळवले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महानगरपालिका आणि रेल्वेच्या अनेक नियमांचं उल्लंघन केलं होतं. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर वृक्षतोडीचे गुन्हे दाखल आहेत. 13 मे रोजी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्यानं 14 लोकांचा नाहक बळी गेला. त्यामुळं भावेश भिंडे याच्यासह अन्य तिघांवर कलम 304 अन्वये पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी भिंडे गुजू ॲड्स नावाची कंपनी चालवत होता. त्याच्यावर आणि कंपनीवर अनेक गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याला महापालिकेने काळ्या यादीत टाकलं होतं. तरीही त्याने Ego Media प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी सुरू केली आणि त्याला होर्डिंगचं कंत्राट मिळू लागले.
हेही वाचा -
- १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला ठार मारण्याची धमकी देत शेजाऱ्याच्या तरुणाकडून बलात्कार - Minor Rape Case Thane
- बलात्कार करुन 1984 मध्ये दाऊद झाला होता फरार; तब्बल 40 वर्षानंतर ठोकल्या बेड्या - Rape Accused Arrested
- धक्कादायक! चॉकलेटचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर ७२ वर्षीय बेकरी चालकाचा लैंगिक अत्याचार - Minor Girl Sexually Assault