मुंबई Mumbai Crime News : मुंबईतील मानखुर्द परिसरात लव जिहादची घटना समोर आल्याचा आरोप करत मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्याचा बंदोबस्त करणार, अशी प्रतिक्रिया मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलीय. तर भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनीही पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलंय. मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या एका तरुणीची हत्या करुन तिचा मृतदेह एकाच सुटकेसमध्ये टाकण्यात आल्याची माहिती समोर आली. एका टॅक्सी ड्रायव्हरनं हा खून केल्याची कबुली दिलीय. त्यामुळं ही लव जिहादची घटना असून अशा पद्धतीनं घटना वाढत असल्यानं आता मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्याचा बंदोबस्त करावा लागणार आहे, अशी प्रतिक्रिया मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिलीय.
कल्याण मध्ये केली तरुणीची हत्या : मानखुर्दमध्ये राहणारी 27 वर्षीय तरुणी मानखुर्द वरुन सॅडहर्स्ट रोड इथं कामानिमित्त जात होती. यादरम्यान, तिचा एका टॅक्सी ड्रायव्हरशी संपर्क आला आणि या संपर्काचं प्रेमात रुपांतर झालं. चालकानं 18 एप्रिल रोजी तिचं अपहरण केलं. तिला कल्याण इथं घेऊन गेला. तिथं तिला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. यात ती मरण पावल्याचं लक्षात येताच तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन सुटकेसमध्ये भरुन निर्जन स्थळी सोडण्यात आले असंही लोढा यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली असून हा लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असल्याचं लोढा म्हणाले.