महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणं भोवलं; पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस शिपायांवर निलंबनाची कुऱ्हाड - Mumbai Cops Planting Drugs

Mumbai Cops Planting Drugs : तबेला मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी मुंबईतील खार पोलिसांनी तबेल्यातील केअर टेकरच्या खिशात ड्रग्ज टाकल्यानं मोठी खळबळ उडाली. केअर टेकरच्या खिशात ड्रग्ज टाकून तेच जप्त करण्यात आल्याची कारवाई करण्यात आली. मात्र तबेल्यातील सीसीटीव्हीतून हा सगळा प्रकार उघड झाला.

Mumbai Cops Planting Drugs
खिशात ड्रग्ज टाकताना पोलीस (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2024, 6:58 AM IST

Updated : Sep 1, 2024, 1:47 PM IST

अंगझडती घेतना संशयिताच्या खिशात ड्रग्ज टाकणं भोवलं (Reporter)

मुंबई Mumbai Cops Planting Drugs : खार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलीस शिपायांना निलंबित करण्यात आलं आहे. वाकोला परिसरात कारवाई करताना एका संशयिताची अनधिकृतपणे झडती घेऊन त्याला ताब्यात घेणं या पोलिसांना महागात पडलं आहे. अंगझडतीच्या नावाखाली स्वतःच्या खिशातील वस्तू ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताच्या खिशात टाकताना पोलीस सीसीटीव्हीत कैद झाले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच परिमंडळ नऊच्या पोलीस उपायुक्तांनी कारवाई करत या पोलिसांना निलंबित केलं.

तबेल्यातील केअर टेकरच्या खिशात टाकलं ड्रग्जचं पाकीट :तबेल्यातील 'केअर टेकर'ला ड्रग्सच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून तबेला मालकाला अडचणीत आणण्याचा खार पोलिसांचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं हाणून पाडला आहे. या केअर टेकरला पकडल्यानंतर खार पोलिसांनी सोबत आणलेले एमडी ड्रग्जचे पाकीट केअर टेकरच्या खिशात टाकताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पोलीस कैद झाले. पोलिसांचं हे कृत्य जनतेसमोर आलं आहे. हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फुटेजमुळे मुंबई पोलिसांची विश्वासाहर्ता पणाला लागली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे.

तबेल्यातील सीसीटीव्हीची पोलिसांना नव्हती कल्पना :मुंबईतील पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ पूर्व कलिना या ठिकाणी असलेल्या एका तबेल्यात 30 ऑगस्टला साध्या वेशातील पाच ते सहा पोलीस पोहोचले. त्यापैकी एक पोलिसानं तबेल्यातील डॅनियल नावाच्या केअर टेकरला ताब्यात घेतलं. साध्या वेषातील व्यक्ती स्वतःची ओळख पोलीस असं सांगून त्यातील एका व्यक्तीनं स्वतःच्या खिशातून एक पाकीट काढून झडतीच्या नावाखाली डॅनियलच्या खिशात टाकलं. त्यानंतर झडतीत त्याच्याकडं अमली पदार्थ (ड्रग्ज) आढळून आल्याचं सांगून त्याला ड्रग्जची बेकायदेशीर विक्री करत असल्याचा आरोप करून त्याला अटक करण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार तबेल्यात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. तबेल्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, ही कल्पना तबेल्यात आलेल्या खार पोलिसांना देखील नव्हती.

सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल :पोलिसांनी तबेल्यातील केअर टेकरच्या खिशात ड्रग्ज टाकल्याचं सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं. त्यानंतर या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्यानंतर खार पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या डॅनियलला सोडण्यात आलं. या व्हायरल व्हिडिओतून खार पोलिसांचं कृत्य लोकांसमोर आलं. त्यामुळे मुंबई पोलिसांची विश्वासार्हता पणाला लागली. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली. तक्रारदार यांना वरिष्ठ अधिकारी यांनी बोलावून त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात तसेच व्हिडिओमध्ये दिसणारे पोलीस हे खार पोलीस ठाण्याचे असल्याचं निष्पन्न झालं. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस सूत्रांनी दिली आहे.

वादातून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न :या प्रकरणी तबेला मालक शाहबाज खान यांना संपर्क केला असता, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "ज्या ठिकाणी हा प्रकार घडला, त्या जागेचा बिल्डरसोबत वाद आहे. या वादातून मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी खार पोलीस ठाण्यातील एटीसीचं पथक आलं. त्यांनी डॅनियलकडं माझ्याबाबत विचारलं. मी त्यांना भेटलो नाही, म्हणून त्यांनी डॅनियलच्या मार्फत मला अडकवण्याचा प्रयत्न केला. डॅनियलच्या खिशात ठेवलेल्या ड्रग्ज प्रकरणी खारचं पथक डॅनियलला घेऊन खारदांडा इथल्या पोलीस चौकीत घेऊन गेले. मी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, हा डॅनियलला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिसांनी ड्रग्ज खिशात टाकल्याचं समोर आलं आहे. मी जेव्हा हा व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांना दाखवला असता त्यांनी तत्काळ डॅनियलला सोडून दिलं. मला फुटेज व्हायरल करू नये आणि डिलीट करावं, यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केला," असं शहाबाज खान यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंच्या अडचणी वाढल्या : पैसे उकळल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल - FIR Against EX DGP Sanjay Pande
  2. अंडरवल्ड डॉन दाऊद, छोटा शकील ते अँटिलिया; नेहमीच वादग्रस्त राहिली सचिन वाजे यांची कारकीर्द - Sachin Vaze Controversial
  3. Sachin Vaze Extortion Case : खंडणी वसुली प्रकरण; सचिन वाझेची सुनावणी 16 जूनपर्यंत तहकूब
Last Updated : Sep 1, 2024, 1:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details