महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुलुंडमध्ये भाजपा गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? जाणून घ्या मतदारसंघाची गणितं

विधानसभेसाठी मुलुंड मतदारसंघात भाषिक वाद, डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न,स्थानिक मुद्दे केंद्रबिंदू ठरणार आहेत. त्यामुळं भाजपाचा गड अभेद्य राहणार की मविआ बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Mulund Assembly Election 2024 bjp vs mahavikas aghadi battleground, know the constituency equations
मुलुंड विधानसभा मतदारसंघ (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Updated : 4 hours ago

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण सहा मतदारसंघ येतात. त्यापैकी मुलुंड विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा मानला जातो. मुंबईच्या वेशीवर आणि ठाण्याच्या बाजूला अशी मुलुंड मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ भाजपाच्या गड मानला जातो. कारण, 1990 पासून इथं भाजपाची सत्ता आहे. मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून सुद्धा या मतदारसंघाकडं पाहिलं जातं. या मतदारसंघात संमिश्र लोकवस्ती असून, गोरगरीब, मध्यम आणि उच्चभ्रू असेही लोक येथे राहतात. सध्या इथं भाजपाकडून मिहिर कोटेचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून राकेश शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रदीप शिरसाट निवडणुकीसाठी उभे ठाकले आहेत. त्यामुळं इथं तिरंगी लढत होणार आहे.

असा आहे इतिहास? : मुलुंड विधानसभा मतदारसंघात 1967 ते 1972 या काळात काँग्रेसची सत्ता होती. त्यानंतर 1978 च्या निवडणुकीत जनता पार्टीनं बाजी मारली. यानंतर 1980 ते 1985 विधानसभा निवडणुकीत पुन्हा काँग्रेसनं मुसंडी मारत आपला आमदार निवडून आणला. यानंतर 1990 रोजी भाजपाचे वामनराव परब हे विजय झाले. पहिल्यांदाला येथे भाजपाचा आमदार निवडून आला. तेव्हापासून भाजपानं आपला गड राखलाय. 1995 मध्ये किरीट सोमैया आमदार म्हणून पहिल्यांदा निवडून आले. 1999 ते 2014 या काळात सरदार तारासिंग हे सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 2019 मध्ये मिहिर कोटेचा यांनी निवडणूक लढवत पुन्हा एकदा भाजपाचा गड कायम राखला. या मतदारसंघात सरदार तारासिंग यांचं मोठं काम आणि नाव आहे. 2020 रोजी सरदार तारासिंग यांचं निधन झालं. आता इथून भाजपाचे मिहिर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे.

मतदारसंघात काय आहेत समस्या? : गेल्या 30 वर्षांपासून इथं भाजपाची सत्ता आहे. मात्र, काही प्रश्न भाजपालाही सोडवता आले नाहीत. इथं बहुभाषिक म्हणजे गुजराती, जैन, मराठी, उत्तर भारतीय तसंच उच्चभ्रु वस्तीतील लोकं राहतात. त्यामुळं या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भाषिक वाद पाहायला मिळतो. विशेष म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. चांगले रस्ते, वाहतूक कोंडी, पाण्याचा प्रश्न आदी प्रश्न हे निवडणूक आली की निवडणुकीतील प्रचाराचे केंद्रबिंदू ठरतात. मुलुंड विधानसभा मतदारसंघात एकूण 289 मतदान केंद्र आहेत. मुलुंड पूर्वेला गव्हाणपाडा, निर्मलनगर, मिठागर, नवघर आदी परिसर येतात. तर मुलुंड पश्चिमेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून मुलुंड कॉलनीपर्यंत मुलुंडचा भौगोलिकदृष्ट्या मोठा विस्तार आहे.

पक्षीय बलाबल कसं? : मुलुंड विधानसभा मतदारसंघात मागील 30 वर्षापासून भाजपाची एकहाती सत्ता आहे. सरदार तारासिंग यांनी सलग चार वेळा रेकॉर्डब्रेक विजय मिळवला आहे. तर किरीट सोमय्या, मिहिर कोटेचा यांनी मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा हा गड राखेल असं तज्ञ आणि जाणकारांना वाटतंय. पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात मतांचे विभाजन झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उबाठा) राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि काँग्रेस या तिघांची ताकद मोठी असल्यामुळं भाजपला आपला गड राखणं सोपं नाही. यावेळी भाजपाकडून लोकसभा निवडणुकीत उभे राहिलेले मिहिर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कोटेचा हे अमराठी आहेत. तर इथे महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे राकेश शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

निवडणूक प्रचारात भाषिक मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. पक्षीय बलाबल पाहिलं तर येथे भाजपाचे वर्चस्व बऱ्यापैकी आहे. ही जरी वस्तुस्थिती असली तरी महाविकास आघाडीदेखील महायुतीला कडवी झुंज देईल. या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. भाजपाकडून मिहिर कोटेचा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर काँग्रेसकडून राकेश शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रदीप शिरसाट हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं 23 नोव्हेंबरला विजयी कोण होणार? याकडे मुलुंडकरांचे लक्ष लागले आहे. सध्या या मतदारसंघात 3 लाखांच्यावर मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 60 हजारांच्यावर आहे. तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 50 हजारांच्यावर आहेत. इथे जरी भाजपाची सत्ता असली तरी, इथे काटे की टक्कर होणार आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे. पण शेवटी बाजी कोण मारणार याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीत मजुरांना 'अच्छे दिन'; नेमकी भानगड काय?
  2. उबाठाच्या तीन प्राथमिकता नोकरी . . नोकरी अन् नोकरी; धारावीत उभारणार वित्तीय केंद्र, उद्धव ठाकरेंनी जाहीर केला वचननामा
  3. "सत्तेसाठी इकडून तिकडं उड्या मारण्याचं काम...", राज ठाकरेंनी कुणाला लगावला टोला?
Last Updated : 4 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details