ठाणे MP Shrikant Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 ला खासदारांनी एक गाव दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याचं आवाहन केलं होते. यात खासदार श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबईतील नागाव हे गाव दत्तक घेतलं होतं. मात्र खासदार डॉक्टर असूनही त्यांनी घेतलेल्या दत्तक गावात आरोग्याचा मुख्य प्रश्न होता. त्यासाठी आरोग्य केंद्रही उभारलं नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त करत उपचारासाठी 10 ते 17 किमीचा प्रवास करावा लागत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. यात गरोदर महिला, लहान मुलं आणि गंभीर रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. मागील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या नवीमुंबईतील चौदा गावांपैकी नागाव गाव कल्याण लोकसभा मतदासंघात आहे. या गावात 2 हजारच्या आसपास लोकवस्ती आहे. मात्र मोदी सरकारची आदर्श ग्राम योजना केवळ कागदावरच राहिली असून खासदारांनी याची गांभीर्यानं दखल घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत या दत्तक गावात 'ईटीव्ही भारत'नं फेरफटका मारल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत.
गावात काहीही बदललेलं नाही : "मागील अनेक वर्ष सुविधांपासून वंचित राहिलेल्या या गावाला डॉ श्रीकांत शिंदेनी दत्तक घेतल्यापासून नागरी सुविधा मिळतील, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली होती. मात्र 2016 साली गाव दत्तक घेतल्यापासून बोटावर मोजता येईल, इतकी कामं गावात झाली. यापैकी आमचं गाव दत्तक घेतलेले खासदार शिंदे यांनी सीएसआर फंडातून डिजिटल शाळा सुरु करण्यासाठी गावाला भेट दिली. त्या दरम्यान त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आणि आमच्या गावातील एकमेव तलाव स्वच्छ करण्यासाठी निधी दिला. तसंच 1 किमीचा डांबरी रस्ता तयार करण्यात आलाय. याशिवाय गावात काहीही बदललेलं नाही," अशी खंत गावचे पोलीस पाटील गजानन पाटील यांनी व्यक्त केलीय.
महानगर पालिकेच्या सुविधा मिळ्याव्यात : "गावात आरोग्य केंद्र व्हावं, अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवानं आमच्याकडं महत्त्वाच्या सुविधांनी सुसज्ज चांगलं आरोग्य केंद्र नसून शिक्षणाचीही समस्या आहेच," असंही पोलीस पाटील यांनी सांगितलं. गावात 10वी पर्यंत शाळा असावी, ही गावातील ग्रामस्थांची मागणी आहे. शिवाय गावाला एक प्रमुख मार्ग प्रस्तावित आहे, जो खीडकाळी जवळ येतो. यामुळं बरंचस अंतर वाचू शकतं. हा रस्ता व्हावा ही देखील प्रमुख मागणी आहे. आता नवी मुंबई महानगर पालिकेत समावेश झाल्यानंतर महानगर पालिकेच्या सुविधा मिळाव्यात ही देखील प्रमुख मागणी गावकरी करत आहेत.
खासदार आपल्या मुलाला अशा शाळेत पाठवणार का : नागावचे माजी सरपंच बाळाराम पाटील यांनी गावातील अनेक नागरी सुविधांना मंजुरी मिळावी म्हणून पाठपुरावा केला होता. त्यामुळं गावात पाण्याची सोय चांगली आहे. बाळाराम पाटील म्हणाले, “खासदारांनी गाव दत्तक घेतल्यावर समस्यांची यादी यांच्याकडं देण्यात आली होती. गावात सातवीपर्यंतची शाळा आहे, पण दोनच शिक्षक आहेत, ते कसं सांभाळणार? मुलं चांगलं कसं शिकतील? केवळ दिवसापुरते संगणक देणे आणि डिजिटल घोषणा करणे म्हणजे विकास होत नाही. खासदार आपल्या मुलाला अशा शाळेत पाठवणार का? आरोग्य सुविधांची अवस्था बिकट आहे."