पीडित मतिमंद मुलीच्या भविष्यासाठी झगडणारी आईचा झाला मृत्यु (Amravati Reporter) अमरावती Mothers Day 2024 :अनेक आजारानं ग्रस्त, लैंगिक प्रकरणामुळं पीडित मतिमंद असणाऱ्या मुलीला (Mentally Handicapped Girl) न्याय मिळावा यासाठी मागील चार वर्षांपासून झगडणाऱ्या आईचं शुक्रवारी रात्री किडनीशी संबंधित विकारामुळं अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात निधन (Mother Death) झालं. पीडितेची आई गेली आता तिचं पुढं काय? असा प्रश्न आता गावाला पडलाय.
आईची धडपड थांबली : पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणात आरोपीला न्यायालयानं शिक्षा ठोठावली. मनोधैर्य योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं तिच्यासाठी दोन लाख रुपये मंजूर केले. आपल्या पोटचा गोळा असणाऱ्या मुलीच्या पालन, पोषणाकरिता ही रक्कम आपल्याला मिळावी, यासाठी तिच्या आईची धडपड सुरू होती. मात्र, आता सगळी धडपड शांत झाली. पीडित मतिमंद मुलीच्या आईचं निधन झालं. त्यामुळं मुलीचं आता पुढं काय? हा प्रश्न खरोखरच गंभीर आहे.
अशी आहे सगळी कहाणी :अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यातील एका छोट्याशा गावातील रहिवासी असणाऱ्या एका दांपत्यांना एक मुलगा आणि एक मतिमंद मुलगी आहे. पतीचं फार पूर्वीच निधन झालं होतं. घरची परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळं मुलगा आपली पत्नी आणि दोन मुलं यांच्या पोटापाण्याच्या सोयीकरिता नागपूर येथे मजूरीचं काम करतो. गावातील घरात आई आणि मतिमंद मुलगी अशा या दोघीच राहायच्या. 2020 च्या सप्टेंबर महिन्यात आई मतिमंद मुलीसह धामणगाव रेल्वे येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यानिमित्त गेली होती. त्यावेळी नातेवाईकांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनं 16 सप्टेंबर 2020 रोजी मतिमंद असणाऱ्या मुलीवर बलात्कार केला. या घटनेमुळं आई आणि मुलगी दोघेही प्रचंड हादरल्या होत्या. धामणगाव रेल्वे येथील दत्तापूर पोलीस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
आरोपीला दहा वर्ष कारावासाची शिक्षा : या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं दोन डिसेंबर 2023 ला आरोपीला दहा वर्षांची कारावासाची शिक्षा आणि तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणानं मनोधैर्य योजनेअंतर्गत मतिमंद पीडितेसाठी दोन लाख रुपये मंजूर केले होते. पुढं काय झालं? वाचा खाली....
मनोधैर्य योजनेच्या रक्कमेची अशी झाली भानगड: मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित अल्पवयीन असेल तर ती अठरा वर्षांची होईपर्यंत तिला मंजूर झालेली रक्कम फिक्स डिपॉझिट केली जाते. या प्रकरणात मात्र मतिमंद पीडित ही त्यावेळी 25 वर्षांची असताना देखील तिला मिळणारे दोन लाख रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात आले. "घरात मतिमंद मुलीसह मी एकटीच राहते. तिला खाणं-पिणं समजत नाही. शौचालयाला देखील जाणं कळत नाही. लहानपणी माती आणि दगडं खाल्ल्यामुळं तिच्या पोटात गोळा तयार झाला होता. त्यामुळं तिचं नेहमी पोट दुखतं. तिला चालता देखील येत नाही, अशा परिस्थितीत हाताखाली एखादी महिला ठेवावी लागेल. यामुळं तिला जाहीर झालेली रक्कम माझ्या हाती आली तर तिची सोय करता येईल," अशी आईची इच्छा होती. यासाठी आईनं 23 जानेवारी आणि आता मृत्यूच्या पाच दिवस आधीच म्हणजेच 5 मे रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडं नुकसान भरपाई योजनेअंतर्गत आलेली रक्कम मिळावी, यासाठी दोनवेळा अर्ज केला होता. मात्र, वृद्ध आईच्या अर्जाची दखल घेण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली.
घरात आईचं प्रेत पण नातेवाईकांना पाहून तिला आनंद: गावात मतिमंद मुलगी आणि आई या दोघीच घरात राहायच्या. आज घरात आईचे प्रेत ठेवले असताना गावातील नातेवाईक त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. आई गेली हे मतिमंद असणाऱ्या मुलीला समजलेच नाही. आपले सारे नातेवाईक आज घरी येत आहेत हे पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंद होता. तिला बोलता येत नाही. मात्र, आपल्या साऱ्या नातेवाईकांना ती ओळखते. आपल्या तुटक्या फुटक्या घरात इतके सारे पाहुणे आलेले पाहून तिला आनंद होत असताना, प्रत्येक नातेवाईकाला मात्र आता तिचे काय? असाच प्रश्न भेडसावत होता.
पीडितांच्या कुटुंबाचे हालच : अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीला शिक्षा होते. मात्र, या गुन्ह्यामध्ये ज्यांचे नुकसान होते, अशा गुन्हा पीडितांचे पूर्ण आयुष्यच उध्वस्त होतं. पीडित मुलीच्या पालन- पोषणाकरिता नुकसान भरपाई योजनेअंतर्गत मिळालेले दोन लाख रुपये आपल्या हाती द्यावेत, यासाठी पीडितेची आई सतत अमरावतीच्या न्यायालयात यायच्या. आज त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या लढ्याला यश आलं नाही. गरीब परिस्थिती, दारिद्र्य आणि एखाद्या घटनेमुळं बसलेला धक्का अशी गंभीर परिस्थिती पीडित कुटुंबाची असते. अशी व्यवस्था म्हणजे न्यायाचा झालेला पराभवच आहे, असं खेदानं म्हणावं लागत असल्याची प्रतिक्रिया मतिमंद मुलीला न्याय मिळावा यासाठी धडपड करणाऱ्या, वकील ज्योती खांडपासोळे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा -
- जीवन वाचविणारे पाणीच ठरतेय मृत्यूला आमंत्रण: मेळघाटातील गामस्थांना मूत्रपिंडाचे आजार, अनेकांचे मृत्यू - Amravati water issue
- वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित
- मेळघाटात व्याघ्र दर्शन; कोलकास- सेमाडोह परिसरात पर्यटकांनी अनुभवला थरार