ठाणे Thane Crime News : ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात (Kapurbawadi Police Station) जून २०१८ मध्ये दाखल विनयभंग आणि पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यात मानलेल्या मामा असलेल्या ५६ वर्षीय विजय नारायण पटगार याला विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयानं आज शिक्षा सुनावली आहे. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद केला. तर तपास अधिकारी महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बी. जाधव यांनी परिस्थितीजन्य पुरावे सादर केले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी आरोपीस विनयभंग, जीवे ठार मारण्याची धमकी प्रकरणी दोषी ठरवत २० वर्षाचा सश्रम कारावास आणि २० हजाराचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
१६ वर्षीय मुलीचा विनयभंग : ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा विनयभंग आणि ठार मारण्याच्या धमकीबाबत गुन्हा दाखल झाला होता. हा खटला विशेष पॉक्सो न्यायालयात न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांच्या दालनात अंतिम सुनावणीसाठी आला होता. या प्रकरणात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी युक्तिवाद करत तपास अधिकारी पोलीस उपनिरक्षक अश्विनी जाधव यांनी दिलेले तत्सम पुरावे ग्राह्य धरून, आरोपी विजय नारायण पटगार याला दोषी ठरविण्यात आलं.