मुंबई Narendra Modi -महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जाताहेत. महाराष्ट्रात आपणच कसं चांगलं काम करू शकतो. हे दाखवण्याचा दोन्हींकडून प्रयत्न होत आहे. महाविकास आघाडीने अडीच वर्ष कसं चांगलं काम केलं याबाबत मविआतील नेते सांगताना दिसताहेत. तर महायुती सरकारनं अनेक लोककल्याणकारी महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत. यात 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' कशी महिलांसाठी चांगली आहे, याचा पाढा महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने वाचला जात आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 18 च्यावर महाराष्ट्रात सभा घेतल्या होत्या. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वारंवार महाराष्ट्रात येताहेत. विविध पायाभूत सुविधा यांच्या उद्घाटनासाठी मोदी महाराष्ट्र येताहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सतत महाराष्ट्रात येऊन, महायुती सरकारनं जनतेसाठी विविध विकासकामं केली आहेत. असं सांगत मोदी एक प्रकारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताहेत. मोदींचे हे महाराष्ट्रातील दौरे हा विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा एक भाग असल्याचं सुद्धा बोललं जातय. मोदी महाराष्ट्रात येऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत.
मोदींची जादू चालेल? -लोकसभा निवडणूक प्रचारात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकट्या महाराष्ट्रात 18 पेक्षा अधिक सभा घेतल्या होत्या. यावेळी केंद्र सरकारनं गरीब, महिला, विद्यार्थी, शेतकरी, मजूर, कष्टकरी आणि दलित यांच्यासाठी कशी विविध कामं केली आणि विविध योजनांच्या माध्यमातून या घटकांचं कसं सक्षमीकरण केलं. याचा प्रत्येक सभेतून पाढा वाचत होते. परंतु लोकसभा निवडणुकीत याचा फारसा फायदा महायुतीला झाल्याचं दिसला नाही. राज्यात महायुतीला जनतेनं स्पष्ट नाकारलं. तर महाविकास आघाडीला लोकांनी भरभरून मतं दिली. राज्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता. केंद्रातील नेतेही महाराष्ट्राच्या मदतीसाठी आले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, जे पी नड्डा आदी नेत्यांनी महाराष्ट्रात महायुतीचा प्रचार केला होता. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींसह कुठल्याही केंद्रातील नेत्याला मतदारांवर प्रभाव पाडता आला नाही. त्यामुळं आता विधानसभा निवडणूकीपूर्वी मोदी महाराष्ट्र दौरे करताहेत आणि महायुती सरकार कसे लोक कल्याणकारी आणि विकासकामं करत आहे, हे जरी सांगत असले तरी ते मतदारांच्यावर प्रभाव पाडू शकतील का? मोदींची महाराष्ट्रात जादू चालेल का? हे मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालातच स्पष्ट होईल.