शिर्डी (अहमदनगर) Online Gambling On Mobile : एकेकाळी फक्त संवाद साधण्याचं माध्यम म्हणून उपयोगी असलेला मोबाईल आता चालते फिरते जुगाराचे केंद्र (Online Gambling) बनले आहे. पत्यांचे गेम, बेटीग ॲप यामुळं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना या जुगाराचं व्यसन लागलं आहे. पालकांनी यावर विशेष काळजी घेण्याची गरज असून, यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारनं कडक कायदा करण्याची गरज निर्माण झाली असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार सतीश वैजापूरकर यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलं.
संवाद साधण्यासाठी मोबाईलचा वापर: दिवसेंदिवस मुलांचं मोबाईल पाहाण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मोबाईलही ॲडव्हान्स होत चालला आहे. अँड्रॉईड मोबाईल तर अलिबाबाची गुहा बनली आहे. तुमच्याजवळ केवळ इंटरनेट असेल. तर तुम्ही जगातली कोणतीही गोष्ट अनुभवू शकता. इतका मोबाईल प्रभावी बनत चालला आहे. नवीन पिढीही यात गुंतत चालली आहे. एक काळ होता. की मोबाईलचा वापर केवळ एकमेकांशी दूरहून संवाद साधण्यासाठी होत होता. जसं तंत्रज्ञान बदललं तसं मोबाईल बदलला. अँड्रॉईड प्रणालीवर चालणारा मोबाईल आला आणि या क्षेत्रात क्रांतीच झाली. त्यात खऱ्या अर्थानं भर पडली ती फोर जी इंटरनेटची. त्यानंतर मोबाईलचा वापर पूर्णपणे बदलून गेला. मोबाईल म्हणजे चालती फिरती बँक, चालते-फिरते थिएटर, गेम पार्लर तसेच मनोरंजनाचे भांडार बनले. सुरुवातीला केवळ अगदी लहान मुलांचे उन्हाळ्याच्या सुटीत वेळ घालविण्यासाठी खेळले जाणारे खेळही ऑनलाईन जुगारासाठी वापरले जाऊ लागले आहेत.
हजारो कोटींची उलाढाल: मनोरंजनाचं माध्यम म्हणून मोबाईलकडं बघितलं जात होतं. काळ बदलला तसं मोबाईलचा वापरही बदलला. यूपीआय आल्यानंतर मोबाईलवरून केवळ नंबरवर पैसे पाठविणं शक्य होऊ लागलं. क्षणात पैसे कुठेही ट्रान्सफर होऊ लागले. याचा फायदा घेतला जुगार गेमिंग ॲप बनविणाऱ्यानी. वर वर साधे वाटत असलेल्या या ऑनलाईन बेटिंग ॲप्सची उलाढाल हजारो कोटींची आहे. यावरून लक्षात येईल की, किती लोक या ऑनलाईन जुगाराच्या व्यसनात बुडाले आहेत.
हळूहळू खिशातील पैसे कमी : जुगार खेळण्यासाठी जुगाराच्या अट्ट्यावर जायची गरज नाही. म्हणजे कुणी जुगार खेळत असेल. तर त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीलाही समजणार नाही. अशा परिस्थितीत जुगार खेळण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. सुरुवातीला अगदी कमी पैशात जुगार खेळण्याची सोय असल्यामुळं या ॲप्सचं व्यसन अगदी सहज लागते. परंतु नंतर जुगाराच्या आहारी गेल्यावर हळूहळू खिशातील पैसे कमी होऊ शकतात.