अकोला Jay Malokar Death- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी जुलैमध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अकोल्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन आमदार मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढविला होता. दरम्यान यावेळी जय मालोकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यू हृदयविकारानं झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
पोलीस संरक्षण देण्याची जय मालोकर यांच्या कुटुंबाची मागणी (Source- ETV Bharat Reporter)
अकोल्यातील मनसेचे दिवंगत कार्यकर्ते जय मालोकर यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळालं आहे. जय मालोकर यांचा मृत्यू हृदयविकारानं नव्हे तर जबर मारहाणीमुळे झाल्याची बाब शवविच्छेदन अहवालातून समोर आली आहे. याप्रकरणी जय मालोकर यांचे मोठे बंधू विजय मालोकर यांनी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुलासा केला आहे. दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियाच्या जीवाला धोका असल्याचं स्पष्ट करीत पोलीस संरक्षणाची मागणीसुद्धा केली आहे. तसेच जय मालोकर यांचा मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करून न्याय देण्याची त्यांनी मागणी केली आहे.
अमित ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दिली होती भेट-जय मालकर यांचा मृत्यू झाल्यानंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आठवडाभराच्या आतच त्यांच्या घरी भेट दिली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबियांचे त्यांनी सांत्वन केले होते. तर विदर्भ दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी अकोल्यात असताना त्यांच्या कुटुंबीयांची निवासस्थानी जाऊनही भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांनी आवश्यक ती मदत करणार असल्याचं आश्वासनही दिले होते.
नेमका काय घडला होता प्रकार?-राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अमोल मिटकरींच्या वाहनाची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी मनसेचे पक्ष निरीक्षक आणि जिल्हा प्रमुखांसह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर जय मालोकर या मनसे पदाधिकाऱ्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा दावा करण्यात येत होता. या घटनेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दुःख व्यक्त करत कार्यकर्त्यांच्या बळावर राजकारण करू पाहणाऱ्या राज ठाकरे यांनी मनसैनिकाच्या कुटुंबीयांना भेटायला यावं, असं आवाहन केलं होते.
हेही वाचा-
- गर्दी पाहून राज ठाकरे संतापले, मुख्य पदाधिकारी सोडून सर्वांना काढलं सभागृहाबाहेर; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray News
- आदित्य ठाकरेंच्या विरोधातही देणार उमेदवार; अत्याचार अगोदरही होते, निवडणूक आल्यानं विरोधक सरकारला बदनाम करताय का ?, राज ठाकरेंचा हल्लाबोल - Raj Thackeray Slams MVA Leaders