मुंबई Bala Nandgaonkar : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं निर्माण होत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सामील होण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीतील बैठक संपवून राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांसमोर भाष्य केलं आहे.
निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा : "मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच अमित ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. येत्या दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो," अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली. मनसेला महायुतीकडून मिळणाऱ्या एका जागेवर बाळा नांदगावकर उमेदवार असण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू आहे. याबाबतही नांदगावकर यांनी खुलासा केला आहे.
गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो : आपल्या उमेदवारीबाबत बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले, "मी यापूर्वी दोनवेळा दक्षिण मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी सांगितल्यास मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. त्यामुळं काहीही झालं, तरी चालेल. राज ठाकरे आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ, बुधवारी पुन्हा राज ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करेन."