ठाणे : कल्याण ग्रामीणमधील भाजपाचे पदाधिकारी संदीप माळी यांच्यावर झालेल्या तडीपारीच्या कारवाईवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. "संदीप माळी यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध असून निवडणुकीत प्रत्येकजण पक्ष बघत नाही. मित्र म्हणून संदीप माळींनी निवडणुकीत मला उघडपणे समर्थन दिल्यानं त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. राजकीय वातावरण गडूळ करण्याचं काम शिंदे पिता-पुत्रांनी केल्यानं ते वातावरण संपविण्याची वेळ आली आहे," अशी घणाघाती टीका मनसेच्या राजू पाटलांनी केलीय.
आगरी समाजाचा उमेदवार राजू पाटलांना पाठिंबा :गुरुवारी कल्याण ग्रामीणच्या काटई येथील कुशाला हॉटेलमध्ये आगरी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनात कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार राजू पाटील, चेतन महाराज, आगरी वधू-वर सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष काळू कोमसकर, शेतकरी भूमिपुत्र अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष गणेश म्हात्रे, शास्त्री महाराज, 14 गांव संघर्ष समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, जयेश महाराज, तुळशीराम चौधरी, अर्जुन बुवा चौधरी यांच्यासह आगरी समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात आगरी समाजानं कल्याण ग्रामीणचे उमेदवार राजू पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
मनसे आमदार राजू पाटील (Reporter) बाप बेट्यांनी माझा राजकीय घात केला :यावेळी राजू पाटील यांनी आगरी समाजापुढं भाषणातही मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर जोरदार टीका केली. "खासदार श्रीकांत शिंदेला निवडणून आणण्याचा आदेश राज ठाकरे यांनी मला दिला. त्यांचा आदेश पाळून तन मन धनानं श्रीकांत शिंदेला मदत करत त्यांच्या पारड्यात दीड लाखाहून अधिक मत माझ्या मतदारसंघातून मिळवून दिली. मात्र माझ्या निवडणुकीवेळी बाप बेट्यांनी माझा राजकीय घात करत माझ्या विरोधात उमेदवार उभा केला. त्यामुळं राज ठाकरेंचा आदेश पाळणं ती माझी मोठी चूक ठरली. उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर माझे मित्र असून त्यांनी जर लोकसभा लढवली असती, तर आगरी बाणा कसा असतो, हे शिंदे पिता पुत्राला दाखवून दिलं असतं," असं आव्हान करत आगरी समाजाला या बाप बेट्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला.
तिन्ही उमेदवार आगरी समाजाचे :विशेष म्हणजे कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाचे शहर प्रमुख राजेश मोरे , उद्धव ठाकरे गटाकडून सुभाष भोईर आणि मनसेकडून राजू पाटील हे तिन्ही उमेदवार आगरी समाजाचे आहेत. त्यामुळे आगरी मतांचं विभाजन होऊन ते कोणत्या उमेदवारांच्या पारड्यात पडतात, हे निकालानंतर समोर येणार आहे.
हेही वाचा :
- मनसेचे ९९ आमदार निवडून येणार, मनसेच्या एकमेव आमदाराचा दावा; शिवसेना परतफेड करणार का?
- MNS Thackeray Group Alliance : 'युतीपेक्षा भीतीच जास्त'; युतीच्या चर्चेवरून एकमेव मनसे आमदाराचा ठाकरे गटाला टोला
- MNS Warning Against Hawkers : दिवसाला तीन लाख रुपये हफ्ता! यामुळे फेरीवाला फोफावला, पण यापुढे ..? आमदार राजू पाटील यांचा अंतिम इशारा