बुलडाणा : शिवजयंती मिरवणुकीत तरुणाला मारहाण केल्याचा आमदार संजय गायकवाड यांचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. त्यावर आमदार गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे. 'त्या' तरुणाला चोपल्याचा माला कोणताही खेद वाटत नाही, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयात आज शनिवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदारांनी या मारहाणीचं जोरदार समर्थन केलंय. तसंच त्यांनी मारहाणीमागची कारणंही माध्यमांना सांगितली.
मारहाणीचा पश्चाताप नाही :बुलडाण्यात कार्यरत असलेल्या टोळीनं गांजा पिऊन मिरवणुकीत अनेक माता बहिणींवर या आगोदर चाकूनं हल्ला केलाय. यंदाच्या मिरवणुकीपूर्वी देखील आम्ही पोलिसांना याची कल्पना दिली होती. मिरवणुकीत एका मुलीनं याबाबत माला माहिती दिली. एका टोळक्याचा चाकूनं हल्ला करण्याचा बेत असल्याचं तिनं मला सांगितलं. त्यानंतर माझ्या अंगरक्षकानं एका तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यानं माझ्या अंगरक्षकाला खाली पाडलं. त्यानंतर मी तरुणाला मारहाण केली. माझ्या आई-बहिणीच्या रक्षणासाठी 'मी' त्याला चोपल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे. त्यामुळं तरुणांच्या मारहाणीचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. सार्वजनिक कार्यक्रमात असा उपद्रव कोणी निर्माण केल्यास त्यांना देखील याच पद्धतीनं उत्तर देण्यात येईल, असं गायकवाड म्हणाले.