सातारा MLA Jayakumar Gore :कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीनं गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार उघड होऊनही कारवाई नाही :मायणी मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी काढलेली कर्जे भागविण्यासाठी आमदार गोरेंना मेडिकल कॉलेजची भागीदारी देण्यात आली. मात्र, त्यांनी एक रुपयाचेही कर्ज भागविले नाही. उलट दुष्काळी भागात शून्यातून मेडिकल कॉलेज उभारणाऱ्या एम. आर. देशमुखांवरच ईडीने कारवाई केली. वास्तविक, कोरोना काळात आमदार गोरेंनी केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही, असा आरोप दीपक देशमुख यांनी यापूर्वी केला होता.