शिर्डी (अहिल्यानगर) : अमोल खताळ यांनी छोट्याशा गाळ्यात सायबर कॅफेचा व्यवसाय, शेतकर्याचा मुलगा, साधे ग्रामपंचायत सदस्यपद देखील भोगले नाही आणि कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना देखील काँग्रेसचे मोठे नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला. त्यांनी थेट आमदारकीच मिळवली आहे. त्यामुळे सायबर कॅफे चालक ते आमदार हा अमोल खताळ यांचा जीवन प्रवास सगळ्यांनाच अचंबित करणारा आहे.
खताळ विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू - अमोल खताळ हा तरुण संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी संगमनेर शहरात आपला काहीतरी व्यवसाय करायचा म्हणून शहरात आला. सुरुवातीला बसस्थानकाच्या समोर असलेल्या भारतीय स्टेट बँकेच्या शेजारील एका गाळ्यात सायबर कॅफेचा व्यवसाय सुरू केला. या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांचे अर्ज भरणे, विविध ऑनलाईन कामे करणे त्यामुळे काही दिवसांतच खताळ यांनी आपल्या व्यवसायात चांगलाच जम बसवला. पुढे त्यांच्या सायबर कॅफेत गर्दी होवू लागली. पुढे खताळ यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक प्रश्न सोडवण्याचं काम सुरू केलं. यानंतर खताळ यांची राजकारणात एन्ट्री झाली. पुढे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास सुरुवात केली. पुढे खताळ हे विखे पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून तालुक्यात ओळखले जावू लागले.
तरुणांचेही प्रश्न मार्गी लावण्याचं -खताळ यांच्यावर संगमनेर विधानसभा प्रमुख म्हणून जबाबदारी आली. तीही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निभावली. यापुढे जावून विखे पाटील यांनी खताळ यांच्यावर संगमनेर तालुका संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी टाकली. आणि खऱ्याअर्थाने तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला खताळ यांनी संजय गांधी निराधार योजनेचा फायदा करून दिला. त्यामुळे अनेकांना पैसे मिळायला सुरू झाले. याचबरोबर गोरगरीब तरुणांचेही प्रश्न मार्गी लावण्याचं काम केलं आहे. याचबरोबर संगमनेर जिल्हा व्हावा म्हणून अमोल खताळ यांनी संगमनेर बसस्थानकासमोर मोठं साखळी उपोषण देखील केलं होतं. सातत्याने विविध प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवण्याचं काम केलं आहे.