ठाणे : शहरात एक धक्कदायक घटना घडली आहे. उल्हासनगर कॅम्प ५ मधील हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागील बाजूला असलेल्या कचरा पट्टीतील झाडाझुडपात एका तीन वर्षीय मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगवेगळी चार पोलीस पथके तयार करून तपास सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.
कशी घडली घटना? : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृत अल्पवयीन मुलगी ही कुटुंबासह हिल लाईन पोलीस ठाण्याच्या परिसरात राहत होती. 18 नोव्हेंबर रोजी मृत मुलगी ही कामानिमित्त आईसोबत घराबाहेर गेली होती. मात्र, मुलगी अर्ध्या रस्त्यातून गायब झाली. त्यावेळी आईला वाटले की, आपली मुलगी परत घरी गेली असावी. मात्र, काम आटपून आई घरी आली तेव्हा तिला मुलगी घरात दिसली नाही. त्यामुळं आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेण्यात आला. शिवाय या भागातील काही सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आले. मात्र, ती कोठेही आढळून आली नसल्यानं ती बेपत्ता झाल्याची तक्रार हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली."
प्रतिक्रिया देताना पोलीस उपायुक्त सचिन गोरे (ETV Bharat Reporter) आरोपीचा शोध सुरू : "सदरील तक्रारीवरून, पोलीस पथक मुलीचा शोध घेत असतानाच, आज (२१ नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास तिचा अर्धवट जाळलेला मृतदेह हिल लाईन पोलीस स्टेशनच्या मागे असलेल्या कचरा पट्टीतील झाडाझुडपात आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अल्पवयीन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगरमधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण कळू शकेल," असं परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं. मात्र, या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली. तर अज्ञात आरोपीला लवकरच पकडून त्याला फाशीच्या शिक्षेची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा -
- वेश्याव्यवसायाच्या रॅकेटचा पर्दाफाश; सितारा लॉजमधून थायलंडच्या १५ तरुणींची सुटका - Thane Crime News
- अनैतिक संबंधातून पत्नीच्या प्रियकराकडून पतीची हत्या; मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकला खाडीत! - Thane crime News
- धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Thane Gang Rape Case