मुंबई Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची संपूर्ण देशाला उत्सुकता लागली आहे. या ऐतिहासिक क्षणाची प्रत्येकजण आतुरतेनं वाट पाहत आहे. 22 जानेवारी हा संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे. त्यामुळं अनेक राज्य सरकारनं या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राम मंदिराच्या सोहळ्याला राजकीय नेते, बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंतचे अनेक सेलिब्रिटी अयोध्येत दाखल होत आहेत.
चित्रपटगृहात प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं प्रक्षेपण करा : 22 जानेवारीला चित्रपटाचं शूटिंग देखील बंद राहणार आहे. 22 जानेवारी 2024 'हा' रामभक्तांसाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व चित्रपटगृह मालकांनी सोमवारी होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपल्या चित्रपटगृहात करून आपणसुद्धा या उत्सवात सामील व्हावं, असं आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे.
चित्रपटांचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय :22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती विराजमान होणार आहे. यावेळी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीनं देखील 22 जानेवारी म्हणजेच सोमवारी सर्व चित्रपटांचं शूटिंग थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजच्या अध्यक्षांनी याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली असून त्या दिवशी शूटिंग होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.