पुणेTipu Sultan Memorial Issue: पुणे लोकसभा मतदारसंघात आता प्रचाराला जोरदार सुरुवात झाली असून काल एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी आम्ही जिंकलो तर पुण्यात येणाऱ्या काळात टिपू सुल्तान यांचं स्मारक उभारू, असं विधान त्यांनी केलं आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर भाजपाने आक्षेप घेतला असून अनिस सुंडके यांनी केलेलं विधान हे अत्यंत चुकीचं आहे. वेळ पडल्यास भाजपा तसेच हिंदुत्ववादी संघटनेकडून तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे सुंडके यांना दिला आहे.
ते असं वक्तव्य कसं करू शकतात? :पुण्यात भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी धीरज घाटे म्हणाले की, एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडके यांनी जे विधान केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. पुणे शहर ही सांस्कृतिक राजधानी असून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांची भूमी आहे. अशा या भूमीत अनिस सुंडके हे टिपू सुल्तान यांचं स्मारक उभारू असं वक्तव्य कसं करू शकतात? पुणे ही क्रांतिकारी, शूरवीरांची भूमी आहे. असं असताना अनिस सुंडके हे संबंध पुणेकरांचा अपमान कसा करू शकतात? असा प्रश्न घाटे यांनी उपस्थित केला.