अमरावती Amravati News: सातपुडा पर्वत रांगेत वसलेले मेळघाट हे नैसर्गिक वैशिष्टांसह तिथल्या आदिवासी आणि गवळी बांधवांनी जपलेल्या विविध चालीरीती आणि परंपरेसाठी देखील ओळखलं जातं. मेळघाटात अनेक काळापासून वसलेल्या गवळी बांधवांचा दुधाचा मोठा व्यवसाय आहे. प्रत्येक कुटुंबाची एक कुळदैवत आहे. या कुळदैवतचा एक दिवस म्हणून विशिष्ट दिवशी गवळी बांधव आपल्याकडं असणाऱ्या दुधाची विक्रीच करत नाहीत. त्यादिवशी कितीही दूध असलं तरी ते घराबाहेर विकत नाहीत. गवळी बांधवांच्या या आगळ्यावेगळ्या परंपरेसंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रथेचं वैशिष्ट्य आणि महत्व धार्मिक दृष्टीनं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच ते कुटुंबाच्या आरोग्यासाठी ही उपयुक्त असल्याचं लक्षात आलं आहे.
कुटुंबात वैदा काढण्याची परंपरा : गवळी समाजात वैदा काढण्याची परंपरा आहे. आपल्या कुळदैवतेच्या नावानं हा वैदा काढला जातो. गवळी समाजातील कुटुंबात इंजाबाई, आशदेवी, एकवीरा देवी या कुळदैवता आहे. या देवींचा एक दिवस म्हणून त्यादिवशी घरात कितीही दूध असलं तरी ते विकायचं नाही असा नियम कुटुंबाचा आहे. शनिवारी कुटुंबामध्ये "इंजा देवी"ची पूजा होते. त्यामुळं त्या दिवशी घरात कितीही दूध असलं तरी ते विकलं जात नाही. येवले कुटुंबाची कुळदैवता "एकवीरा देवी" आहे. त्यामुळं येवले कुटुंबात रविवारी दूध विक्री होत नाही. तर खंडारे कुटुंबात सोमवारी दूध विकलं जात नाही.
दुधाची पवित्रता जपण्याचा प्रयत्न: गवळी बांधव दुधाला अतिशय पवित्र मानतात. कुलदैवतेच्या पूजेच्या दिवशी दुधाचं पावित्र्य जपलं जावं याची गवळी बांधव पूर्ण काळजी घेतात. या दिवशी घरातलं दूध कोणाला दिलं तर पुढची व्यक्ती ज्या भांड्यामध्ये दूध घेतात ते भांडं धुताना त्याचं पाणी कुठेही फेकून दिलं जातं. यामुळं असं होऊ नये यासाठी गवळी बांधव बाहेर कोणालाही त्या दिवशी दूध देण्याचं टाळतात. दुधाचा एक थेंब असो किंवा दुधाचं भांडं धुतल्यावर त्यातलं पाणी हे चुकीच्या ठिकाणी जाऊ नये याची काळजी घेत दुधाचं पावित्र्य जपलं जात असल्याची माहिती, गावातील रहिवासी संगीता गजानन येवले यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. आमच्याकडं गावातील दूध उत्पादकांसह लगतच्या गावातील दूध उत्पादकांकडून दिवसाला 400 ते 500 लिटर दूध येतं. या दुधाची आम्ही मेळघाटच्या बाहेर विक्री करतो. शनिवारी मात्र आम्ही या दुधाची खरेदी देखील करीत नाही असं देखील संगीता येवले यांनी सांगितलं.